या काळात स्वत:चे मुद्रणयंत्र असण्याची निकड भासू लागली आणि १९७४ मध्ये ‘प्लॅमाग’ कंपनीचे लेटरप्रेस रोटरी प्रिंंटिंग मशीन जर्मनीहून मागविण्यात आली. हे यंत्र एकाचवेळी लोकमतची १६ पाने छापू शकत होते, तसेच ‘लोकमत’ ही अक्षरे लाल रंगात छापत होते. यंत्राची क्षमता ताशी ३० हजार प्रती मुद्रित करण्याची होती.
१९७५ मध्ये लायनोटाईप मशीन घेण्यात आली. त्यामुळे ८ तासात ७ कॉलम मजकूर एक ऑपरेटर तयार करू लागला. त्यानंतर ऑफसेट प्रिंंटिंंगचा जमाना आला. १९८१ साली ताशी २५००० प्रती अंकाची छपाई करण्याची क्षमता असलेले ‘बंधू प्रिंंटिंग प्रेस’ची मशीन घेण्यात आली.
१९८५ साली हॅरिस- एन. ८४५ ए ही मशीन कार्यान्वित झाली. ही मशीन १२ पानांचे वृत्तपत्र ताशी ५०,००० प्रती या वेगाने छापू शकत होती. १९८६ साली नागपूर व औरंगाबाद येथे लायनोट्रॉन-२०२ ही फोटो कम्पोझिंग यंत्रणा बसविण्यात आली. १९८७ च्या सुमारास लोकमतने स्वत:चा सॉफ्टवेअर विकास विभाग सुरू केला.
यानंतर लगेच संपादक विभागासाठी नीटी टेलिकॉम सिस्टिम एम.एस.एस. (मेसेज स्विचिंग सिस्टिम) सुरू करण्यात आली. या पद्धतीमुळे संपादक वर्गाला ऑनलाईन वृत्तसेवा उपलब्ध करून देण्याचा मान लोकमतलाच सर्वप्रथम मिळाला.
मनुग्राफ इंडिया लि.ने तयार केलेली न्यूजलाईन मशीन १९९३ साली घेण्यात आली. ही मशीन १६ पानांचे वृत्तपत्र ताशी ४५००० प्रती या वेगाने छापू शकत होती व पहिले व शेवटचे पान रंगीत छापू शकत होती.
१९९९ मध्ये असे इमेज सेटर्स खरेदी करण्यात आले. त्यामुळे दैनिकात अनेक पाने रंगीत स्वरूपात देणे शक्य झाले. ऑगस्ट १९९७ मध्ये ‘लोकमत-टाइम्स-कॉम’ या नावाची वेबसाईट सुरू करून लोकमत-टाइम्स हे वर्तमानपत्र वेबसाईटवर उपलब्ध करून दिले. जुलै १९९८ रोजी ‘लोकमत’ या मराठी दैनिकाची वेबसाईट ‘लोकमत-कॉम’ या नावाने सुरू करण्यात आली व त्या वेबसाईटवर लोकमत मराठी दैनिक जागतिक वाचकांना प्रथमच उपलब्ध झाले.
नागपूरच्या बुटीबोरी येथील औद्योगिक वसाहतीत २००३ मध्ये अत्याधुनिक छपाई यंत्रणेने सुसज्ज असा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्या ठिकाणी एकाचवेळी २४ पानांचा अंक छापू शकणारी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली व ती मार्च २००४ मध्ये सुरू झाली. यानंतर स्टॅकर्स आणि कन्हेअर्स यंत्रणा कार्यान्वित झाली. २००८ मध्ये पारंपरिक फिल्म आऊटपूटऐवजी सीटीपी (कॉम्प्युटर टू प्लेट) यंत्रणा लागू करण्यात आली.
मार्च २०१५ पासून नागपूर आणि औरंगाबाद प्रकल्पांत सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात आला. यानंतर व्हिडिओ प्लेट पंचिंग अॅण्ड बेंडिंग मशीन, पर्यावरणपूरक असलेली केमेस्ट्री फ्री प्लेट यंत्रणा आदी अत्याधुनिक सामग्रीसह प्रकल्प सज्ज आहे.