नागपूर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘एक वादळ भारताचं’ या चळवळीअंतर्गत दिल्लीतील राजपथ परेडची प्रतिकृती साकार करीत राेमांचक असा स्वातंत्र्य सोहळा मंगळवारी फुटाळा तलाव परिसरात आयाेजित करण्यात आला. हजारो नागपूरकरांनी एकत्र येत राष्ट्रगीत गायन तिरंगा ध्वजाला सलामी दिली.
एक वादळ भारताचं ही चळवळ नागपूरातील तरुण गेल्या आठ वर्षापासून भारतभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून राबवत आहेत. या मोहिमेअंतर्गत यंदा ७ राज्यातील ९० शहरात ४५० हून अधिक ठिकाणी एक साथ राष्ट्रगीत गायन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून फुटाळा तलावावर नेत्रदीपक सोहळा पार पडला.
सकाळी शिवराजे ढोलताशा पथक आणि दोनच राजे या ढोलताशा पथकांच्या गजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर २२ फूट उंच ११ राष्ट्रीय ध्वजांचे एकसाथ आरोहण झाले. त्यानंतर शिवशक्ती आखाड्याच्या वतीने थरारक शिवकालीन आखाडा प्रात्यक्षिके, भीमाई लेझीम पथक, सेंट झेवियर्स ग्रुपचे स्केटिंग डान्स, आयुब अकादमीतर्फे फ्लॅशमॉब, विवेकानंदन पब्लिक स्कुलतर्फे स्काऊट गाईड आणि लेझीम परेड, नागपूर डिस्ट्रिक्ट इक्वेस्ट्रीअनच्या घोडदल पथकाची ध्वजाला सलामी अशा रंगारंग कार्यक्रमांनी उपस्थितांना राेमांचित केले. त्यानंतर राष्ट्रीय ध्वजांचे पथसंचलन करत उपस्थितांनी एकसाथ सामूहिक राष्ट्रगीत गायन करून राष्ट्रध्वजाला वंदन केले.
जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजन
चळवळीचे समन्वयक वैभव शिंदे पाटील, हितेश डफ, निक्कू हिंदुस्थानी यांनी कार्यक्रमाची आखणी केली. त्यानुसार हिंगणा, कामठी, उमरेड, सावनेरसह जिल्ह्यात १४० पेक्षा जास्त ठिकाणी करण्यात आले आहे.