लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उच्च बनावटीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलचे खास प्रशिक्षण घेतलेल्या एनसायक्लोपीडियातील मोहम्मद अन्सारी आणि वास्तुविशारद ज्योती पटेल यांनी एक हजार किमी साहसी सायकल प्रवास विक्रमी वेळेत पूर्ण केला.अशा प्रकारची कामगिरी नागपूरच्या नावावर नोंदविणारा मोहम्मद मध्य भारतातील पहिला तंत्रज्ञ सायकलपटू ठरला आहे. ज्योती पटेलदेखील अशा प्रकारची स्पर्धा पूर्ण करणारी मध्य भारतातील पहिली महिला ठरली आहे. ज्योतीने ७१ तास १९ मिनिटांत आणि मोहम्मदने ७१ तास २० मिनिटांत अंतर पूर्ण केले.आॅडेक्स इंडियाच्यावतीने नागपूर रँडोनेयर्न्स क्लबद्वारे आयोजित नागपूर-हैदराबाद-नागपूर या लांब पल्ल्याच्या ब्रेव्हेट साहसी सायकल प्रकारात हे अंतर पार करण्यासाठी साहसी सायकलपटूंना ७५ तासांचा अवधी दिला होता. शिवाय लांब पल्ल्याच्या अंतरात ठरवून दिलेल्या प्रत्येक टप्प्यात तपासणी नाक्यावर नियोजित वेळेत पोहचून सायकलपटूंना वेळेची नोंदणी करावी लागते.प्रजासत्ताक दिनी सकाळी ६ वाजता या सायकलपटूंनी प्रवासाला सुरुवात केली. यात सहभागी सायकलपटूंना झिरो माईल, पाटणसावंगी, परत नागपूर-जांब-हिंगणघाट-हैदराबाद आणि हिंगणघाट-जांब-नागपूर असा प्रवास पूर्ण करायचा होता. यात १२ साहसी सायकलपटूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी आठ जणांनी प्रवास सुरू केला. त्यापैकी पाच जणांनी हे अंतर वेळेत पूर्ण केले. गजानन ढोरे यांनी (७४ तास, ५७ मिनिट) आणि विजय धनजोडे (७४ तास, ५५मिनिटे), वरुडचे माजी सैनिक देवानंद मेश्राम यांनी (७१ तास, ३५ मिनिटात) हे अंतर पूर्ण केले.विशेष म्हणजे, मोहम्मद अन्सारीने गेल्यावर्षी २००, ३००, ४०० आणि ६०० कि. मी. असा साहसी सायकल प्रवास पूर्ण करीत सुपर रँडोनेयर्र्न्सचा किताब पटकावला होता. ज्योतीने देखील एकाच वर्षात दोन वेळा हा किताब पटकावला. विशेष म्हणजे, ज्योतीने अलीकडेच झालेल्या गेट वे आॅफ इंडिया ते इंडिया गेट असा १४०० किमीचा साहसी सायकल प्रवासही पूर्ण केला आहे.
७१ तासांत एक हजार कि.मी.चा सायकल प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:10 PM
उच्च बनावटीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलचे खास प्रशिक्षण घेतलेल्या एनसायक्लोपीडियातील मोहम्मद अन्सारी आणि वास्तुविशारद ज्योती पटेल यांनी एक हजार किमी साहसी सायकल प्रवास विक्रमी वेळेत पूर्ण केला.
ठळक मुद्देज्योती पटेल, मोहम्मद अन्सारीची विक्रमाला गवसणी