नागपूर : रोख अथवा दागिने अथवा मौल्यवान वस्तू घेऊन पळण्याचे, लंपास करण्याचे, ऑनलाईन, ऑफलाईन फसवणूक करण्याचे अनेक प्रकार नेहमीच जिकडे तिकडे घडतात. नागपुरात मात्र आज चोरी कम फसवणूकीचा एक अफलातून प्रकार घडला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीसही चक्रावले आहेत.
सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास एका व्यक्तीने नागपूर स्थानकावर येऊन एसीचे दोन तिकिट काढले. त्यावेळी तेथे असलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीने तिकिट काढणाऱ्यासोबत सलगी साधली. दोघांमध्ये नंतर अशा काही गप्पा रंगल्या की त्यांनी नंतर एकमेकांना चहाचा आग्रह धरला. दरम्यान अनोळखी व्यक्तीने कोणते तिकिट काढले, ते बघण्याच्या नावाखाली आपल्या हातात घेतले आणि तेथून तो सटकला.
बराच वेळ होऊनही तो परत आला नाही. काही वेळेनंतर आरोपीने ईतवारी रेल्वे स्थानकाच्या काउंटरवर जाऊन ते दोन्ही तिकिट कॅन्सल केले आणि त्याबदल्यात रक्कम परत घेऊन तो पळून गेला. तिकिट कॅन्सलेशनचा मेसेज संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर आल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. या अफलातून प्रकारामुळे आता पोलीसही चक्रावले आहेत.