नागपूर : समग्र शिक्षा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश दिले जातात. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळावा, याकरिता शासनाकडून एका गणवेशासाठी निधी प्राप्त झाला. जिल्हा परिषद प्रशासनाने विद्यार्थी संख्येनिहाय , हा निधी तालुकास्तरावर वळता केला असून विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. परंतु राज्य सरकारने एक गणवेश सर्व विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा देण्याचा निर्णय घेतला. मात्र हा गणवेश कधी मिळणार हा संभ्रम कायम आहे.
एका गणवेशासाठी जि.प. प्रशासनाने १.९९ कोटीवरील निधी शाळास्तरावर वळता करण्यात आला आहे. शाळा स्तरावर गणवेशाची खरेदी केली जाणार आहे समग्रअंतर्गत महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाºया सर्व मुली, एससी, एसटी आणि बीपीएल संवर्गातील मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिल्या जातो. त्यानुसार समग्रच्या २०२३-२४ च्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गणवेश संचाकरिता ६०० रुपये मंजूरही करण्यात आले आहे.
नागपूर जि.प. शिक्षण विभागानेही २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी साठी १५१५ शाळांतील ६६ हजार ५१६ विद्यार्थ्यांची नोंदणीही आॅनलाईनरित्या पूर्ण केली होती. परंतु शैक्षणिक सत्र सुरु होण्याची तारीख तोंडावर येऊनही शासनाकडून कुठल्याही सूच्ना नव्हत्या. जि.प. शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन समिती सर्व संभ्रमात होते. मात्र, २९ मे रोजी २०२३ रोजी शिक्षण परिषदेने पत्र काढून हा संभ्रम दूर केला आहे. सोबतच जूनच्या पहिल्याच आठवड्यात विद्यार्थ्यांच्या एका गणवेशासाठी ३०० रुपयाप्रमाणे ६६ हजार ५१६ विद्यार्थ्यांकरिता शासनस्तररावरुन जिल्हा परिषदेकडे १ कोटी ९९ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा निधीही वळता झाला. दुसऱ्या गणवेशाबाबत अद्यापही निर्णय हा गुलदस्त्यातच आहे. शाळा व्यवस्थापन समिती निर्णय घेणार
गणवेश खरेदीचे अधिकार (गणवेश रंग, प्रकार, स्पेशिफिकेशन आदी) दरवर्षीप्रमाणेच यंदाही शाळा व्यवस्थापन समितीलाच बहाल आहेत. त्यानुसार तालुकास्तरावरुन शाळांना निधी मिळताच, त्यांच्याकडून दरपत्रक मागवित विद्यार्थ्यांकरिता मापानुसार गणवेश खरेदी करायचा आहे. आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी अर्थात ३० जून २०२३ रोजी विद्यार्थ्यांना या गणवेशाचे वितरणही करायचे आहे. विशेष म्हणजे, गणवेश पुरवठादारास देयक हे रोखीने अदा न करता ते ‘पीएफएमएस’ प्रणालीव्दारेच करायची आहे.