अभय लांजेवार
उमरेड : राज्यभरात गाजलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी श्रीनिवास रेड्डी हे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन सीसीएफ म्हणून कर्तव्यावर होते. त्यावेळी काही जी-हुजुरी करणाऱ्या वन्यप्रेमींनी साहेबांना खुश करण्यासाठी एका वाघाचे चक्क ‘श्रीनिवास’ असे नामकरण केले. साधारणत: पाच ते सात वर्षांपर्वी करण्यात आलेल्या या नामकरणानंतर आता दीपाली चव्हाण प्रकरणात श्रीनिवास रेड्डी हे जेलची हवा खात आहेत. यावरून उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातसुद्धा त्यावेळी गाजलेल्या अनेक प्रकरणांची चर्चा रंगू लागली आहे. अभयारण्यातील श्रीनिवास नावाच्या या वाघाचा मृतदेह नागभीड तालुक्यातील एका शेतात आढळून आला होता. त्यामुळे ‘एक होता श्रीनिवास नावाचा वाघ’ अशी प्रतिक्रिया काही वन्यप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.
आशिया खंडाचा सुपरस्टार असलेल्या जय नावाचा दमदार वाघसुद्धा श्रीनिवास रेड्डी सीसीएफ असतानाच अचानक गायब झाला होता. जयचे प्रेतही गवसले नाही. त्याचा पत्ता अद्यापही कोणतीही यंत्रणा लावू शकली नाही. यातच गोठणगाववाल्या वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला. या दोन बछड्यांपैकी एकाला श्रीनिवास तर दुसऱ्याला बिट्टू असे नामकरण केल्या गेले. श्रीनिवास आणि बिट्टू अशी जोडी त्यावेळी गाजली होती. शिवाय ‘फेअरी’ हे नावसुद्धा चर्चेत आले होते. फेअरी नावाची एक विदेशी तरुणी काही महिने या परिसरात जंगल सफारीसाठी आली असताना काही वन्यप्रेमींनी तिचे नाव देत तिलाही खुश केले. बड्या अधिकाऱ्यांशी जवळीकता साधण्यासाठी आणि आपली खासगी दलालीचे कामे उरकविण्यासाठी अधिकाऱ्यांचे नाव देण्याची शक्कल त्या काळात चांगलीच गाजली होती.
--
श्रीनिवास खड्ड्यात, बिट्टू जंगलात
जय आणि फेअरी यांच्या सहवासातून जन्मलेल्या श्रीनिवास आणि बिट्टू या दोघांपैकी श्रीनिवास नावाचा वाघ साधारणत: अडीच वर्षाचा असतानाच शेतातील एका खड्ड्यात पुरला गेला होता. विद्युत स्पर्शाने तो मृत्युमुखी पडला. शेतकऱ्याने शेतात प्रेत गाडले. व्हिडिओ कॉलर असल्याने ही घटना नागभीड तालुक्यात उघडकीस आली. दुसरीकडे बिट्टू नावाचा दुसरा वाघ नागभीड परिसरातील तळोधी शिवारातील जंगलात मोकळा श्वास घेत असल्याची माहिती आहे.
सखोल चौकशीची मागणी
१६ जून २०१६ हे जय वाघाचे अखेरचे लोकेशन होते. जय गायब झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्यानंतरच वन, वन्यजीव खाते खडबडून जागे झाले होते. विशेषत: यादरम्यान दीपाली चव्हाण प्रकरणातील सहआरोपी श्रीनिवास रेड्डी हे सीसीएफ म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्पात कर्तव्यावर होते. त्यामुळे या प्रकरणाचीसुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
--
त्या काळात श्रीनिवास, बिट्टू, फेअरी असे नामकरण काहींच्या स्वार्थी हट्टामुळे केल्या गेले. ही बाब सत्य आहे. असे जरी असले तरी वन्यजीव विभागाशी या नामकरणाचा कवडीचाही संबंध नव्हता. वन्यजीव विभागाच्या दप्तरी सांकेतिक कोडचाच वापर केला जातो. त्यामुळे अशा नामकरणाला काहीही अर्थ राहत नाही.
सुहास बोकडे
वन्यप्रेमी, उमरेड