नागपूर : लॉकडाऊनच्या काळात शटर वर-खाली करून आणि मागच्या दाराने दुकाने सुरू ठेवून व्यवसाय करणाऱ्या काही व्यापाऱ्यांची दुकाने आता थेट सील करावी, अशी मागणी आता खुद्द व्यापारी संघटनांकडून होऊ लागली आहे. सरकारला सहकार्य करण्याऐवजी काही व्यापारी दुकाने सुरू ठेवून संघटनेला काळिमा फासत असल्याचे मत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
मस्कासाथ, इतवारी, गांधीबाग आणि सीताबर्डी, खामला, कमाल चौक आणि जरीपटका बाजारपेठांमध्ये अनेक व्यापारी अर्धवट दुकाने सुरू ठेवून व्यवसाय करीत आहेत. प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना वगळून सर्व प्रकारची दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. किराणा दुकाने, डेअरी, भाजीपाला व फळ विक्रेत्यांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. पण अनेक व्यापारी आदेशाचे उल्लंघन करून ११ नंतरही दुकाने सुरू ठेवत असल्याचे दिसून येत आहे. फळ विक्रेत्यांची दुकाने दिवसभर सुरू असतात. कमाल चौकात अनेक दुकानदार शटर बंद करून बाहेर माल काढून विक्री करीत आहेत. मानेवाडा रोडवर हीच स्थिती आहे. अशीच स्थिती इतवारी, मस्कासाथ आणि गांधीबाग भागात दिसून येत आहे. इतवारीतील बहुतांश किराणा दुकानदार मागच्या दाराने व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे या भागात नेहमीच गर्दी दिसून येत आहे. गल्लीबोळात कारवाई होत नसल्याने दुकानदारांचे फावत आहे. मालक दुकानासमोर बसून मालाची विक्री करीत आहेत. अशा दुकानदारांवर दंड न ठोठावता थेट दुकान सील करण्याची गरज असल्याचे मत व्यापारी संघटकांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
ब्रेक दर चेनअंतर्गत शासनाने व्यापारी आणि नागरिकांसाठी नियमावली घोषित केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दंड वसूल करण्याचे अधिकार पोलीस आणि मनपाला दिले आहेत. इतवारी भागात ठोक किराणा दुकानदार दरदिवशी दुकान उघडून किरकोळ विक्रेत्यांना माल पाठवीत आहेत. मनपाच्या एनडीएस पथकाने या भागातील अनेक दुकानदारांकडून दंड वसूल केला आहे, पण ते समजण्यापलीकडे आहे. गोळीबार चौकातील नागरिक म्हणाले, येथील गल्लीबोळात दुकाने सुरू आहेत. या दुकानदारांवर कुणीही कारवाई करीत नाही. पोलीस आणि मनपाचे पथक या भागात येत नाही. त्यामुळे कठोर कारवाई करून सुरू असलेली दुकाने सील करून लॉकडाऊन सुरू असेपर्यंत बंद ठेवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दुकाने सुरू ठेवणे अनुचित
लॉकडाऊनच्या काळात सरकारला सहकार्य करण्यासाठी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन सर्व व्यापारी संघटनांना केले आहे. पण काही बेजबाबदार दुकानदार दुकाने सुरू ठेवून संघटनांना काळिमा फासत आहे. दुकाने बंद ठेवण्याची त्या त्या संघटनांची जबाबदारी आहे. त्यासाठी दुकानदारांना जागरूक करणे आवश्यक आहे.
अश्विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.