लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन आठवड्यांपूर्वी किरकोळ बाजारात कांद्याचे दर ४० ते ५० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. आता तोच कांदा किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये किलोने उपलब्ध होत आहे. कळमना बाजारात कांद्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कांदा उत्पादक क्षेत्रातून हा कांदा शेकडो टनाच्या रूपात नागपुरात येत आहे. त्याचा परिणाम हे दर उतरले आहेत.
उन्हाळा आणि कांद्याची गरज वाढणे, याचा जवळचा संबंध आहे. घरोघरी उन्हाळ्यात जेवणाच्या थाळीत सलाद म्हणून कांदा हमखास असतो, शिवाय उन्हाळ्यात उन्ह किंवा झाव लागू नये, म्हणून कांदा बाळगण्याचे प्रमाण वाढत असते. त्याचप्रमाणे, भाजीमध्ये ग्रेवी घट्ट करण्यासाठी आणि फोडणीसाठी कांदा हा अत्यंत महत्त्वाचा ओला मसाला आहे. त्यामुळेच कांद्याचे महत्त्व जनसामान्यांत अनन्यसाधारण आहे. विशेष म्हणजे, कांद्यामुळे सत्ता पालट झाल्याची उदाहरणे महाराष्ट्राने अनेकदा बघितली आहेत. भराभरा महागाई वाढत असल्याच्या काळात कांद्याचे दर घसरणे, हा नागरिकांना दिलासा देणारा प्रकार आहे. नागपुरात सद्य:स्थितीत बंगालच्या सुखसागर, महाराष्ट्रातून नाशिक, बुलडाणा, अकोला, आकोट, जळगाव, जामोद, कर्नाटक आदी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात कांदा उतरत आहे. त्याचा परिणाम म्हणून हे दर घसरत असल्याचे दिसून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी लाल कांदा ठोक बाजारात ८०० रुपये मत (४० किलो) तर पांढरा कांदा ६५० रुपये मण दराने विकला जात होता. आता लाल कांदा ५५० रुपये मण तर पांढरा कांदा ४०० रुपये मण दराने विकला जात आहे.
---------
दररोज २५ ट्रक कांदा उतरतोय
नागपूरच्या कळमना बाजारात दररोज २५ ते ३० ट्रक कांदा उतरत आहे. एका ट्रकमध्ये साधारणत: १२ ते १५ टन कांदा असतो. त्याचा परिणाम म्हणून कांद्याचे दर प्रचंड घसरले आहेत. दीड महिन्यांपूर्वी केवळ गुजरातमधून कांदा येत होता. तोही फार कमी असल्याचे कांद्याचे दर प्रचंड वाढले होते. आता ग्राहकांसाठी दिलासादायक चित्र आहे.
- मोहम्मद मुन्शिफ, ठोक कांदा व्यापारी, कळमना
------------------
लाल कांद्याला प्रचंड मागणी
ग्राहकांमध्ये लाल कांद्याला प्रचंड मागणी असते. त्यामुळे या कांंद्याचे दरही पांढऱ्या कांद्यापेक्षा जास्त असते. सद्य:स्थितीत किरकोळ बाजारात लाल कांदा २५ ते पांढरा कांदा २० रुपये किलो दराने विकला जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी हेच दर दुप्पट होते.
- आलोक हरडे, किरकोळ कांदा व्यापारी
------------
* दोन आठवड्यापूर्वी कांद्याचे दर (ठोक)
लाल कांदा - २५ रुपये किलो
पांढरा कांदा - २० रुपये किलो
* दोन आठवड्यांपूर्वी कांद्याचे दर (किरकोळ)
लाल कांदा - ४० ते ५० रुपये किलो
पांढरा कांदा - २५ ते ३० रुपये किलो
* कांद्याचे वर्तमान दर (ठोक)
लाल कांदा - १० ते १३ रुपये किलो
पांढरा कांदा - ५ ते ९ रुपये किलो
* कांद्याचे वर्तमान दर (किरकोळ)
लाल कांदा - २५ रुपये किलो
पांढरा कांदा - २० रुपये किलो
..................