लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमन्यात ६० रुपयांवर गेलेल्या कांद्याचे भाव लॉकडाऊनमुळे फारच कमी झाले असून, ३ ते ८ रुपये किलो भावाने विकल्या जात आहेत. या भावातही खरेदीदार नसल्याने कांदा सडत आहे. दररोज १० टनापेक्षा जास्त कांदे फेकून द्यावे लागत आहे. हीच स्थिती राहिल्यास कांद्याची आवक बंद करावी लागेल, असे अडतियांनी सांगितले.कांदे-बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, कळमन्यात दररोज लहान-मोठ्या १५ गाड्यांची आवक आहे. सध्या अकोला, अमरावती, बुलडाणा येथून लाल आणि पांढरे कांदे विक्रीस येत आहेत. एक, दोन गाड्या अहमदनगर, नाशिक येथून येत आहेत. शेतकऱ्यांना माल न पाठविल्याची विनंती करण्यात येत आहे. त्यानंतरही माल विक्रीसाठी पाठवीत आहेत. कळमना बाजार सोमवार, बुधवार आणि रविवारी सुरू असल्याने खरेदीदारही कमी झाले आहेत. शिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद असल्याने कांद्याला उठावच नाही. माल कुठे विकायचा, हा प्रश्न व्यापारी आणि अडतियांसमोर उभा राहिला आहे. बाजार तीन दिवसच सुरू असल्याने किरकोळ व्यापारी शेतकऱ्यांकडून थेट माल मागवत आहेत. कळमन्यात किंमत कमी असली तरीही किरकोळमध्ये जास्त भावातच ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. कमी किमतीचा फायदा ग्राहकांना मिळायला हवा, असे वसानी म्हणाले. किरकोळ विक्रेते खरेदीसाठी कळमन्यात आल्यास हा प्रश्न निकाली निघणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध अटींमुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचा त्रास वाढला आहे.लॉकडाऊनमध्ये मालाची आवक वाढलीमनाई केल्यानंतरही शेतकरी कांदे विक्रीसाठी कळमन्यात पाठवीत आहेत. त्यामुळे मालाचा साठा कुठे करायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अखेर कांदे गाडीतच ठेवावे लागतात. माल न उतरविल्याने गाडीतच खराब होत आहेत. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. बाजारात येणारा कांदा उन्हाळी असल्याने साठवून ठेवता येतो. पण किती कांदा साठवून ठेवायचा, हा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.बटाट्यांना मागणीउन्हाळ्यात प्रत्येक घरी बटाट्यापासून चिप्स वा काही खाद्यान्न तयार करण्यात येत असल्याने बटाट्याला मागणी वाढली आहे. दररोज २० ट्रकची आवक आहे आणि विक्रीही त्याच प्रमाणात होत आहे. कळमन्यात दर्जानुसार १५ ते २० रुपये किलो भाव आहे.