नागपूर : कांद्याची आवक कमी असल्याने ठोक बाजारात भाव मोठ्या प्रमाणात वाढले. दरवाढीची धोक्याची घंटी ओळखून केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारल्याने नागपुरातील कळमना ठोक बाजारात दर्जानुसार २० ते २५ रुपये किलोवर पोहोचलेले लाल कांदे आणि ३० ते ३५ रुपये किलो दराचे पांढरे कांदे दोन दिवसांतच ७ ते ८ रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. पुढे भाव आणखी कमी होतील, अशी व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया आहे.
टोमॅटोच्या भावानंतर कांद्याच्या वाढीव दराची ओरड सुरू झाली होती. पण केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गृहिणींना दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे कांदे उत्पादन शेतकऱ्यांनी निर्यात वाढीच्या निर्णयाला सरकारची दडपशाही म्हटले आहे. निर्यात शुल्क वाढीचा परिणाम शनिवारी पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील नाशिकच्या लासलगाव येथील मुख्य बाजारपेठेत दिसून आला. कांद्याचे भाव घसरल्याची माहिती आहे.
कळमना बाजारातील आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष गौरव हरडे म्हणाले, यंदा प्रारंभी मुसळधार पावसामुळे कांद्याचे पीक खराब झाले आणि आवक कमी झाली. आवकीच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव हळूहळू वाढले. दुसरीकडे निर्यातही वाढली. किरकोळमध्ये लाल कांदे दर्जानुसार ५० रुपये आणि पांढरे कांदे ५५ ते ६० रुपये किलोवर पोहोचले. भाव कमी होताच भाव सामान्यांच्या आवाक्यात येणार आहे. सध्या कळमन्यात नगर, बाळापूर, नाशिक, मध्यप्रदेशातून २० ट्रकची आवक आहे. पुढे आवक वाढून भाव कमी होतील.
मध्यंतरी कळमन्यात प्रतिकिलो २१० ते २२० रुपयांवर गेलेले लसणाचे दर दर्जानुसार १३० ते १८० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. हे दर मुसळधार पावसामुळे पीक खराब झाल्याने वाढले होते. भाव जानेवारीपर्यंत स्थिर राहतील किंवा वाढतील, असे गौरव हरडे म्हणाले. सध्या दररोज ५ ते ६ ट्रक लसूण विक्रीला येत आहे.