लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०८ वा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक ठरणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच दीक्षांत समारंभाचे ऑनलाईन आयोजन करण्यात येणार आहे. ९ जुलै रोजी विशेष व नियमित असे दोन्ही दीक्षांत समारंभ होणार आहेत. कोरोनाच्या निर्बंधामुळे ५० लोकांची प्रत्यक्ष उपस्थिती राहणार असून, गुणवंतांना दुसऱ्या दिवसानंतर पदके देण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.,
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका नागपूर विद्यापीठालादेखील बसला. ११ एप्रिल रोजी नियोजित विशेष दीक्षांत समारंभ व २३ एप्रिल रोजीचा १०८ वा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आला. विशेष दीक्षांत समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांना एलएलडी या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार होते. परंतु कडक निर्बंधामुळे आयोजन करणे शक्य नव्हते. राज्यातील इतर विद्यापीठांचे दीक्षांत समारंभ झाल्याने विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा होत होती. अखेर विद्यापीठाने ९ जुलै रोजी ऑनलाईन दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. हा समारंभ विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होईल. समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांना एलएलडी पदवी प्रदान केली जाईल. सभागृहात केवळ ५० लोकांनाच प्रवेश राहणार आहे. यातील २२ लोक तर मंचावरच राहतील. त्यात अधिकारी व व्यवस्थापन परिषद सदस्यांचा समावेश असेल. इतर सर्व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित राहतील. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनादेखील प्रवेश नसेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना विद्याशाखानिहाय पदके देणार
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पदके देणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांना समारंभ झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दीक्षांत सभागृहात बोलविण्यात येईल व विद्याशाखानिहाय त्यांना पदके देण्यात येतील. पीएचडी संशोधकांनादेखील त्याच पद्धतीने पदवी प्रमाणपत्र देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.