नागपूर विद्यापीठ : हिवाळी परीक्षांना सुरुवातनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना बुधवारपासून सुरुवात झाली. यंदापासून सर्व परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांची ‘आॅनलाईन डिलिव्हरी’ करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी प्रशासनाचे अधिकारी यामुळे तणावात होते. परंतु ही योजना यशस्वी ठरली आणि अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.नागपूर विद्यापीठाने उन्हाळी परीक्षांत अभियांत्रिकी शाखेत प्रश्नपत्रिकांच्या ‘आॅनलाईन डिलिव्हरी’चा प्रयोग राबविला होता. त्यानंतर यंदापासून सर्वच अभ्यासक्रमांसाठी ही प्रणाली लागू करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी १९५ परीक्षा केंद्रांवर ४९ विषयांच्या प्रश्नपत्रिका ‘आॅनलाईन’ पाठविण्यात आल्या. परीक्षा केंद्रांवर या प्रश्नपत्रिका ‘डाऊनलोड’ करण्यात आल्या व त्याच्या प्रती विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणींमुळे प्रश्नपत्रिका उशिरा ‘डाऊनलोड’ झाल्या. मात्र यामुळे परीक्षेवर कुठलाही परिणाम झाला नाही.बुधवारच्या दुसऱ्या सत्रात ६१ विषयांच्या प्रश्नपत्रिकांना ‘आॅनलाईन’ पाठविण्यात आले. दोन्ही सत्रांत प्रश्नपत्रिका वेळेवर पोहोचल्याने व ठराविक वेळापत्रकानुसार परीक्षा सुरू झाल्याने अधिकाऱ्यांनी नि:श्वास सोडला.वेळ, पैसा यांची बचत ‘आॅनलाईन’ प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्यामुळे विद्यापीठाचे काम सोपे झाले आहे. अगोदर प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पाठवा, त्यासाठी मनुष्यबळ लावा, त्यांची धावपळ इत्यादी बाबी होत्या. यामुळे चुकीने भलत्याच विषयाची प्रश्नपत्रिका वाटणे, अगोदरच लिफाफे फोडणे, असे प्रकार व्हायचे. नव्या प्रणालीमुळे खर्चदेखील वाचला आहे आणि वेळेत परीक्षा सुरू झाल्या. परीक्षा केंद्रांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले, असे मत प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी) पहाटेच परीक्षा भवन झाले सुरू‘आॅनलाईन’ प्रश्नपत्रिकांच्या प्रणालीत काही गडबड झाली असती तर विद्यापीठावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते. त्यामुळे पहाटे ४ वाजताच काही अधिकारी व कर्मचारी परीक्षा भवनात पोहोचले. ८ वाजता ‘आॅनलाईन’ प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांच्या ‘लॉगिन’वर पोहोचल्या होत्या.
प्रश्नपत्रिकांची आॅनलाईन डिलिव्हरी यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2016 3:13 AM