लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संक्रमणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे रूप बदलले आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाला न येता संघ प्रमुखांचे भाषण घरातूनच ऐकण्याच्या सूचना स्वयंसेवकांना मिळाल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी गणवेश न घालता पारंपरिक पोशाख वापरावा, असे सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या संक्रमणामुळे यंदा या समारंभाचे एकूण चित्रच बदलले आहे. दरवर्षीसारखी यंदा प्रात्यक्षिके नसतील. फक्त संघ प्रमुख संबोधित करतील. हा समारंभ यंदा रेशीमबाग मैदानावरील डॉ. हेडगेवार स्मृति मंदिर परिसरात असलेल्या महर्षी व्यास सभागृहात होईल. एवढेच काय तर, अतिथी म्हणून कुणालाही निमंत्रित केले जाणार नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सभागृहात फक्त ५० व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. यात घोष पथकाचाही समावेश असेल. संघ प्रमुखांचे संबोधन ऑनलाईन असेल. ते ऐकण्यासाठी नियम आणि ड्रेस कोड ठरविण्यात आला आहे. ऑनलाईन संबोधन ऐकताना शारीरिक अंतर राखण्याचे निर्देश स्वयंसेवकांना देण्यात आले आहेत. चांगले कार्य करणाऱ्या शेजारील व्यक्तींनाही हे संबोधन ऐकण्यासाठी घरी आमंत्रित करण्यासाठी सांगण्यात आले आहे.
संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरील व्यक्तींसोबत हे मार्गदर्शन ऐकायचे असल्याने गणवेश अनिवार्य करण्यात आलेला नाही. पारंपरिक पोशाख उत्सवाची अनुभूती देईल, हा त्यामागील हेतू आहे. संघाच्या आयोजनात गणवेश अनिवार्य नसण्याची ही आजवरच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.