नागपूर : केंद्र शासनातर्फे केदारनाथ, गंगोत्री व यमुनोत्री हा बारमाही मार्ग तयार करण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चारधाम परियोजना राबविण्यात येत आहे. या परियोजनेंतर्गत ऋषिकेश-धारासू-गंगोत्री या मार्गावर ४४० मीटर लांबीचा चंबा बोगदा तयार करण्यात आला आहे.
मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बोगद्याचे ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून उद्घाटन झाले. विशेष म्हणजे, अतिशय खडतर परिस्थितीत ‘मिलिटरी’च्या ‘बीआरओ’ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) या संस्थेने विक्रमी वेळेत हे काम पूर्ण केले. या परियोजनेतील हे एक ऐतिहासिक पाऊल मानण्यात येत आहे.
ऋषिकेश-धरासू-गंगोत्री मार्गावर ८६ कोटींचा चंबा हा बोगदा तयार करण्यात आला आहे. चंबा या गावाच्या खालून राष्ट्रीय महामार्ग ९४ वर हा बोगदा करण्यात आला आहे. केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या राष्ट्रीय मार्ग ९४ मुळे उत्तराखंडमध्ये पर्यटनाला चालना मिळणार आहे.पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. तेथे पर्यटकांना मिळणाऱ्या सोयीसुविधा या जागतिक दर्जाच्या मिळाव्या याकडे उत्तराखंड शासनाने लक्ष द्यावे.
या कामासाठी उत्तराखंड सरकारचे बहुमोल सहकार्य मिळाले आहे. उत्तराखंड येथे यापूर्वी नैसर्गिक आपत्तीत अनेक जणांचे मृत्यू झाले. त्याचवेळी तयार करण्याचा संकल्प आपण केला होता. बाराही महिने हा रस्ता सुरू राहणार आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. चंबा बोगद्यामुळे ज्या एक किलोमीटरसाठी अर्धा तास लागायचा ते अंतर आता १० मिनिटात पूर्ण करता येणार आहे. जानेवारी २०१९ मध्ये ‘बीआरओ’ने बोगद्याचे काम सुरूकेले होते. अत्याधुनिक आॅस्ट्रियन तंत्रज्ञानाने या बोगद्याचे काम करण्यात आले आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
२५१ किलोमीटरचा मार्ग वेळेपूर्वीच पूर्ण होणार
केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हा २५१ किलोमीटरचा मार्ग असून, तो जानेवारी २०२१ मध्ये पूर्ण होणार होता; परंतु कामाची गती लक्षात घेता यावर्षी आॅक्टोबरमध्येच तो पूर्ण होईल. या रस्त्यामुळे चंबा गावात होणारी वाहतुकीची कोंडी सुटणार असून, वेळेची बचत होणार आहे. तसेच मानसरोवराचा रस्ताही अत्यंत कठीण आहे. तेथेही बीआरओ चांगले काम करीत आहे. मानसरोवराला कारमध्ये बसून जाण्याचे आपले स्वप्न आहे.- नितीन गडकरी,
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री
चारधाम परियोजनेंतर्गत ऋषिकेश- धारासू- गंगोत्री या मार्गावर ४४० मीटर लांबीचा चंबा बोगदा तयार करण्यात आला आहे. मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म- लघु- मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बोगद्याचे ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून उद्घाटन झाले. विशेष म्हणजे अतिशय खडतर परिस्थितीत ‘मिलिटरी’च्या ‘बीआरओ’ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) या संस्थेने विक्रमी वेळेत हे काम पूर्ण केले.