लोकमत न्यूज नेटवर्क आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे असे म्हटले जाते ते तितकेच खरे आहे . जागतिक स्तरावर औद्योगिक क्रांती ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होत आहे . जगावर कोविड—१९ चे सावट आले तसेच ते भारतावर सुद्धा आले. यामध्ये खरी तंत्रज्ञानाची किती गरज आज आहे याची जाणीव सर्वांना झाली. त्यामध्ये शिक्षण क्षेत्र सुद्धा कसे सुटणार? शिक्षण क्षेत्रामध्ये ऑफलाईन शिक्षणाला अत्यंत महत्व आहे.
ऑनलाईन प्रक्रियाही शिक्षण प्रक्रियेला पूरक म्हणून ठरवू शकते . परंतु सर्वस्वी ठरेल असे नाही. कोविड १९ चा हाहाकार सर्व जगभर निर्माण झाल्याने जगभर लॉक डाऊन लागले. यात शिक्षण प्रक्रिया थांबू नये म्हणून ऑनलाईन ह्या पूरक अध्ययन प्रक्रियेला महत्व देण्यात आले. हे चालू असतानाच ग्रामीण भागातील मात्र वास्तविक ऑनलाईन शिक्षणाची सद्यस्थिती ही वेगळी आढळून आली. ऑनलाईन प्रक्रिया म्हटले की अँड्रॉइड मोबाइल आले, रेंज आली, व अँड्रॉइड मोबाईल घेण्यासाठी पालकांची परिस्थिती आली. अँड्रॉइड मोबाईल चे ज्ञान आले व मुलांना ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेची जाणीव ग्रामीण भागात किती आहे हेही आले.
ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करत असताना शेतीची कामे इतर कामे ही आली, रिचार्ज भरण्यासाठी पैसा आला. अशा अनेक संकटात ग्रामीण भागातील पालकांची परिस्थिती होती. अशाही परिस्थितीत एका छोट्याशा खेड्यातील तांड्यात आम्ही प्राथमिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया करिता व्हाॅट्सअप ग्रुप तयार करुन शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.
काही दिवस प्रतिसाद मिळाला. परंतु हळूहळू मात्र पालक व विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी पठार अवस्था येत होती. अशाही परिस्थितीत आम्ही शिक्षक वारंवार प्रयत्न करतच होतो. गावात रेंज नाही , शेतात जावे लागते, मजुरीला जावे लागते, मोबाईल रिचार्ज मारण्यासाठी पैसे नाहीत अशा पालकांच्या तक्रारी येऊ लागल्या तर काही पालकांनी आमचे पाल्य हेडफोन लावून अभ्यास सोडून कार्टून्स,गेम्स व म्युझिक मध्ये दंग राहात असल्याने मुले वेगळ्या वळणाला जात आहे. अशा तक्रारीसह अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत होते.
अशा अनेक अडचणी आल्या व येत असल्याने आॅफलाइन शाळा सुरु करा असा आग्रह पालकांचा आहे. यावरुन ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेची परिस्थिती लक्षात येत असून ही सत्य परिस्थिती नाकारून चालणार नाही. हे आम्ही अनुभवले.
सगळीकडे तंत्रज्ञानाचा गवगवा असताना ग्रामीण भागामध्ये मात्र या तंत्रज्ञानापासून आपण खरंच किठी लांब आहोत? हे दिसून येते. हे सर्व बघून पुन्हा जोमाने काम करण्याची इच्छाशक्ती निर्माण होते .आलेल्या अडचणीवर मात करून शिक्षण प्रक्रिया पुन्हा कोविड १९च्या काळात सर्व दक्षता घेऊन आॅफलाइन पद्धतीने जोमाने सुरु करावी असे मनस्वी वाटते.
भविष्यात गावोगावी इंटरनेटची उपलब्धता करुन देऊन विद्यार्थ्यांकरीता कमीत कमी किंमतीचे स्मार्ट फोन,टॅब व कमीत —कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध करुन दिल्यास तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने शिक्षणात उंच भरारी घेतील यात तिळमात्र शंका नाही. ऑफलाइन पद्धतीला ऑनलाईन शिक्षणाची जोड दिली तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांशी स्पर्धा करु शकतील. अशी अपेक्षा बाळगू या .
➡ साहेबराव आत्माराम राठोडसहाय्यक शिक्षक जि.प.प्राथ.शाळा,वडसद(तांडा) पं.स.पुसद जि.यवतमाळ