नागपूर : पाकिस्तानच्या झेंड्यांची भारतात ‘ऑनलाईन’ विक्री करण्यात येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात ‘ॲमेझॉन’ या ई-कॉमर्स कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. यामुळे गणेशपेठ परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ॲमेझॉनवरून पाकिस्तानच्या झेंड्यांची ऑनलाईन विक्री होत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्कदेखील केला होता. मात्र तरीदेखील ही विक्री थांबली नव्हती असा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते निदर्शने करत गणेशपेठ येथील बैद्यनाथ चौकाजवळील ॲमेझॉनच्या कार्यालयात शिरले. तेथे अगोदर कंपनीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना ही विक्री का होत आहे असा जाब विचारण्यात आला व त्यानंतर तेथील सामानाची तोडफोड करण्यात आली.
कार्यकर्त्यांनी खुर्च्यांचीदेखील फेकाफेक केली. पोलिसांच्या पथकाने येत कार्यकर्त्यांना आवर घातला. आम्ही स्वत:ऑनलाईन तपासणी केली व झेंडे विकल्या जातात का याची खात्री केली. कंपनीकडून आमच्या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यांच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यासदेखील मनाई केली. त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला अशी भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी मांडली.
तोडफोडीनंतर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
या तोडफोडीनंतर कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागपूर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीदेखील तेथे पोहोचले. यानंतर कार्यालयासमोरच मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देशाची माफी मागत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी मांडली. यावेळी शहराध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे, दुर्गेश साकुलकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.