नागपूर : सोमवारी २८ जूनपासून शाळा उघडणार असल्या तरी कोरोना संक्रमणामुळे वर्ग ऑनलाईनच भरणार आहेत. पुस्तकाशिवाय अभ्यान नाही, हे खरे असले तरी यंदा बालभारतीकडून पुस्तकांचा पुरवठा वेळवर झाला नाही. त्यामुळे महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळा पुस्तकाविनाच भरणार, असे दिसत आहे.
ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या जवळपास १,५३० तर नागपूर शहरात महापालिकेच्या १५६ वर शाळा आहेत. शहर व ग्रामीण भागात इतर अनुदानित एक हजारावर शाळा आहे. येथील सर्व इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या १ लाख ४९ हजारावर विद्यार्थ्यांकरिता जि.प.च्या शिक्षण विभागाकडून जवळपास ८ लाख २ हजाराहून अधिक पुस्तकांची मागणी बालभारतीकडे अनेक दिवसांपूर्वीच केली आहे. दरवर्षी बालभारतीकडून साधारणत: मे महिन्यात पुस्तकांची छपाई होऊन केंद्र शाळांवर पोहोचविली जाते. परंतु सोमवारपासून शहर व ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या शाळा ऑनलाईन सुरु होत असल्या तरी पुस्तके उपलब्ध नाहीत. गतवर्षी कोरोनाचा प्रकोप असतानाही शाळांना दहा दिवसांपूर्वीच पुस्तके उपलब्ध होऊन सत्र सुरु होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हातात पडली होती.
...
शिक्षकांना दैनंदिन अहवाल सादर करणे अनिवार्य
विद्यार्थ्यांविना उद्या सोमवारपासून यंदाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असून ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार आहे. पहिली ते नववी शिक्षक ५० टक्के उपस्थिती, तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य आहे. शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचे सांगण्यात येते. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविले की ऑफलाईन याचा अहवाल त्यांना दररोज ग्रामीण भागात केंद्र प्रमुखांकडे सादर करावा लागणार आहे.
...
पाठ्यपुस्तकाच्या पुनर्वापर योजनेला प्रतिसाद नाही
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ८ डिसेंबर, २०२० रोजी पाठ्यपुस्तकाच्या पुनर्वापराबाबत शासन निर्णय निर्गमित केला होता. त्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला होता. पुस्तकांच्या पुनर्वापरामुळे कागदांची बचत होत असल्याने पालकांनी पुस्तके परत करावी, असे आवाहनवजा विनंती शिक्षण विभागाने केली होती. परंतु नागपूर जिल्ह्यातील पालकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामीण भागात गतवर्षी वितरित केलेल्या एकूण पुस्तकांपैकी केवळ १५ ते १८ टक्के पुस्तके परत आल्याची माहिती आहे.
...
कोट
युडायसप्रमाणे बालभारतीकडे पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली. अद्यापपर्यंत पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. पुस्तके उपलब्ध होताच विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येईल.
- चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)