लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन खरेदी केलेले टी शर्ट परत करण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला सायबर ठगाने ९९,९९५ रुपयांचा गंडा घातला. ऑनलाईन खरेदी विक्रीचा व्यवहार कसे जोखमीचे ठरू शकते, त्याचे हे प्रकरण उत्तम उदाहरण आहे. या अफलातून फसवणूक प्रकरणात शांतीनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.संदीप धरमचंद जैन (वय ४९) हे शांतीनगरातील तुळस अपार्टमेंटमध्ये राहतात. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून त्यांनी एक टी शर्ट विकत घेतला होता. तो पसंत न पडल्याने त्यांनी हा टी शर्ट परत करण्यासाठी संबंधित क्लब फॅक्टरीचा गुगलवरून संपर्क क्रमांक शोधला. ३१ जानेवारी २०१९ ला रात्री ७.१५ ते ७.२० या वेळेत त्यांनी ७००३९०७७०५ या क्रमांकावर फोन केला. त्या मोबाईलवर बोलणाऱ्या ठगबाजाने जैन यांना टी शर्टची रक्कम कोणत्या खात्यात जमा करायची, अशी विचारणा करून जैन यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती मिळवली. त्यांचा ओटीपी नंबरही मिळवला आणि त्या माहितीच्या आधारे ठगबाजाने जैन यांच्या खात्यातून ९९,९९५ रुपये स्पाईस मनी नामक खात्यात वळते करून घेतले. हा प्रकार लक्षात यायला बराच उशीर झाला. आपल्या खात्यातील सुमारे एक लाख रुपये कमी झाल्याचे कळाल्यानंतर जैन यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना त्यांच्या बँक खात्याचा यूपीआय अॅक्टिव्ह करून ही रक्कम वळती करण्यात आल्याचे समजले. एका टी शर्टच्या खरेदीसाठी आणि नंतर ती परत करण्यासाठी ९९,९९५ रुपये गमावलेल्या जैन यांनी शांतीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सायबर सेलच्या माध्यमातून ठगबाजाचा शोध घेतला जात आहे.