सुमेध वाघमारेआॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यभरातील मेडिकलमध्ये ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम’ (एचआयएमएस) राबवून रुग्णांची वैद्यकीय माहितीसह इतरही कामकाज एका ‘क्लिक’वर उपलब्ध होणार होते. परंतु ११ वर्षे उलटूनही ही प्रणाली पूर्णक्षमतेने सुरू झाली नाही. सद्यस्थितीत केवळ ५० टक्केच या प्रणालीचा वापर होत आहे; असे असताना यावर खर्च झालेले कोट्यवधी रुपये व या कंपनीचे शासनाकडे थकीत असलेल्या सुमारे ३४ कोटी रुपयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रणालीचा फायदा कुणाला, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाने २००६ मध्ये ‘एचआयएमएस’ प्रणाली सुरू केली. यात राज्यातील सर्व मेडिकलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नावापासून ते रुग्णावर कोणते उपचार केले, त्याच्यावर कोणती औषधे परिणामकारक आहेत, कोणत्या औषधांची ‘अॅलर्जी’ आहे, रुग्णाच्या एक्स-रेपासून ते विविध चाचण्यांची माहिती संगणकाच्या एका ‘क्लिक’वर मिळणार होती. रु ग्ण १० वर्षांनंतरही उपचारासाठी आल्यास त्याचा पूर्वेतिहास सहज मिळू शकणार होता. याशिवाय रुग्णालयातील विविध आर्थिक व्यवहार, औषधांची खरेदी, औषधांचा साठा, उपलब्ध यंत्रसामुग्री, रुग्णांना दिला जाणारा रोजचा आहार एवढेच नव्हे तर लॉन्ड्रीला जाणाºया रोजच्या कपड्यांच्या माहितीचा समावेशही या प्रणालीत होणार होता. या प्रणालीशी राज्यातील सर्व मेडिकल कॉलेज जोडले जाणार होते. सर्व मेडिकल कॉलेजमध्ये एकवाक्यता येणार होती. विशिष्ट आजाराच्या रुग्णांची माहिती एकत्र केली जाणार असल्याने संशोधनाला वाव होता. यामुळे ‘एचआयएमएस’वर दरवर्षी तीन-चार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला. या प्रणालीची सुरुवात मुंबईच्या जेजे रुग्णालयातून झाली; नंतर पुण्याचे ससून, २००९ मध्ये नागपूर मेडिकलसह इतरही रुग्णालयांमध्ये याची सुरुवात झाली. परंतु एवढा खर्च व मोठा कालावधी लोटूनही ही प्रणाली बहुसंख्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागापुरतीच मर्यादित असल्याचे वास्तव आहे.