लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईल हा आजच्या काळात जवळजवळ शरीराचे अंग झाला आहे. मात्र यासोबत सायबर गुन्ह्याचे धोकेही वाढले आहेत. विशेषत: ऑनलाईन व्यवहारात हे धोके कित्येक पटीने वाढले आहेत आणि मानवी चुका या सुरक्षेमध्ये सेंध लावणाऱ्या आहेत. भारतामध्ये तर सायबर सुरक्षेकडे नगण्य लक्ष दिले जाते. पण अशा धोक्यांमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. काळानुसार तंत्रज्ञानाशी सामंजस्य साधणे गरजेचे आहे. केवळ असे व्यवहार हाताळताना काळजी घेतली व अलर्ट राहून कार्य केल्यास सुरक्षा आपल्या हाती आहे, असे प्रतिपादन आयटी अभ्यासक आणि प्रशिक्षक प्रशांत जोशी यांनी केले.जनमंचच्यावतीने आयोजित जनसंवाद कार्यक्रमांतर्गत शनिवारी धनवटे सभागृह, शंकरनगर येथे ‘सुरक्षित ऑनलाईन व्यवहार’ या विषयावर मार्गदर्शक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रशांत जोशी यांनी संगणक हाताळण्यापासून आवश्यक मूलभूत गोष्टी, सुरक्षित उपयोग, नेटबँकिंग, पासवर्ड टीप्स अशा सर्व अंगाने मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, नवनवीन तंत्रज्ञान सातत्याने येत असल्याने नवशिक्यांप्रमाणे तज्ज्ञांकडूनही चुका होतात. मात्र मध्यम मार्ग पत्करणाऱ्यांना सुरक्षेचा धोका कमी असतो. सायबर गुन्हेगारांकडून ७० ते ८० कोटी मलिन सॉफ्टवेअर तयार असून मोबाईलमधील ९० टक्के अॅप्स हे धोकादायक आहेत व त्यांना अजाणतेपणाने अपलोड करणे म्हणजे सुरक्षेशी तडजोड केल्यासारखे आहे. मोफत काहीच नसते व त्यामुळे कधीकधी खूप मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे मोबाईलपेक्षा आपल्या संगणकारवर ऑनलाईल व्यवहार करा, असा सल्ला त्यांनी दिला.बँक सुरक्षेच्या दृष्टीने काम करीत असते, आपल्याला चुका टाळायच्या आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना प्रमाणित साईट्सचाच वापर करो, संगणकावर दिसणाऱ्या कुकीज किंवा इतर सॉफ्टवेअरवर नाहक जाण्याचा प्रयत्न करू नका. या कुकीज तुमच्याबद्दलची माहिती गोळा करण्याच्याच प्रयत्नात असतात. तुमच्या व्यवहाराची नोंद एकतर मेंदूत किंवा स्वतंत्र डायरीत करून ठेवा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा अकाऊंटची माहिती बँक कधीही फोनवर मागत नाही. बँकेच्या नावाने गळ टाकून तुमची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अशा फोनने घाबरून जाऊ नका व कुठलीही माहिती देऊ नका. भावनिकतेत पासवर्ड ठेवू नका, तो जेवढा किचकट ठेवता येईल तेवढा प्रयत्न करा आणि काही महिन्यांनी तो बदलत राहा. सार्वजनिक वायफायचा उपयोग करून वैयक्तिक आणि व्यावहारिक माहितीचे आदानप्रदान करू नका.बँक खाते एकापेक्षा अधिक ठेवा व कमी डिपॉझिट असलेल्या खात्यातून व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. आपल्या संगणकामध्ये घुसखोरी तर झाली नाही ना, याबाबत वारंवार तपासणी करीत राहा, याबाबत मार्गदर्शन करीत कधीही सुरक्षेशी तडजोड करू नका, असे आवाहन त्यांनी केले.रमेश बोरकुटे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन रामा खरे यांनी केले.