लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम सुरू केली. सुरुवातीला त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. परंतु, लसीकरणाबाबत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये प्रचंड गैरसमज पसरल्याने ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. मुळात देशात आतापर्यंत पार पडलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर या लस अतिशय प्रभावी ठरत असल्याचे दिसून येते. लसीकरणाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लसीकरणानंतर पॉझिटिव्ह आलेल्यांचे प्रमाण केवळ ०.०२ ते ०.०४ टक्के इतके अत्यल्प आहे. म्हणजेच कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण अतिशय प्रभावी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सध्याचे कोरोनाचे थैमान बघता आता लस हाच एकमेव पर्याय म्हणता येईल. तेव्हा लोकांनीही यासंदर्भातील गैरसमज दूर करावेत, प्रशासनाने यासंदर्भात जनजागृती करण्याची गरज आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी देशात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड अशा दोन लसी टोचल्या जात आहेत. या दोन्ही अतिशय यशस्वी ठरल्या आहेत. देशात कोव्हॅक्सिन ही लस आतापर्यंत १.१ कोटी लोकांनी टोचून घेतली आहे. यामध्ये ९३ लाख ५६ हजार ४३६ लोकांनी पहिला डोस घेतला. या पहिल्या डोसनंतर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या लोकांची संख्या ४२०८ म्हणजे केवळ ०.०४ टक्के इतकी आहे. तसेच १७ लाख २७ हजार १७८ लोकांनी दुसरा डोज घेतला. यापैकी केवळ ६९५ म्हणजेच ०.०.४ टक्के लोक पॉझिटिव्ह आले. तसेच कोविशिल्ड ही लस आतापर्यंत ११.६ कोटी लोकांनी टोचून घेतली आहे. यात १० कोटी ३ लाख २ हजार ७४५ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यापैकी १७,१४५ म्हणजेच ०.०२ टक्के इतके जण पॉझिटिव्ह आलेत. तसेच १ कोटी ५७ लाख ३२ हजार ७५४ जणांनी दुसरा डोस घेतला असून, यापैकी ५०१४ म्हणजेच ०.०३ टक्के इतके जण पॉझिटिव्ह आले. एकूणच ही आकडेवारी पाहिली तर दोन्ही लसी या कोरोनाच्या रोखथामासाठी अतिशय प्रभावी ठरत असल्याचे दिसून येते.
चौकट
ग्रामीण भाागात लसीकरणाची गती मंदावली
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले होते. परंतु, लसीकरणानंतर मृत्यू होत असल्याची भीती ग्रामीण भागात वाढली आहे. परिणामी, लसीकरणाच्या सुरुवातीला प्रत्येक केंद्रावर दोनशे ते अडीचशे लोकांच्या रांगा लागायच्या. मात्र भीतीमुळे ही गती मंदावली आहे. आता १५ ते २० लोकही लस घेण्यासाठी येत नाही, असे चित्र आहे. याचा परिणामही दिसून येत आहे. दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. ग्रामीण भागातून अधिकृतपणे येणारा मृत्यूचा आकडा वाढत आहे. घरातच होणाऱ्या मृत्यूंची संख्याही मोठी आहे. गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर पाहिजे त्या प्रमाणात भर देण्यात आला नाही. त्याचा विपरित परिणाम आता दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले.
- लस घेतल्यानंतर येतोय ताप
लस घेतल्यानंतर ताप येतो, हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पाच ते सहा दिवस लोटल्यानंतर ते कोरोना टेस्ट करतात आणि त्यात ते पॉझिटिव्ह निघतात. तोपर्यंत कोरोनाचे इन्फेक्शन वाढून जाते. पुढे उपचारात होत असलेल्या अडचणींमुळे रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे बोलले जात आहे. अशा अनेक घटना दररोज ग्रामीण भागात घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.