अवयवदान जागरूकता कार्यक्रम नागपूर : उपराजधानीत दरवर्षी ७५ हजार ब्रेन डेड (मेंदू मृत) रुग्ण आढळून येतात. परंतु केवळ ०.३ टक्केच अवयव दान होते. गेल्या दोन वर्षांत आठ ब्रेन डेड रुग्णांकडून अवयवदान करण्यात आले. सध्या शहरामध्ये २०० रुग्ण किडनी दात्यांच्या प्रतीक्षेत आयुष्याचे अखेरचे क्षण मोजत आहेत. अवयव दानातून दुसऱ्यांना जीवनदान करण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत अजूनही म्हणावी तशी जागृती झालेली नाही, अशी खंत प्रसिद्ध नेफ्रालॉजी तज्ज्ञांनी व्यक्त केली.‘इंडियन सोसायटी आॅफ आॅर्गन ट्रान्सप्लांट’आणि ‘सेंट्रल इंडिया नेफ्रोलॉजी सोसायटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अवयवदान जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित पत्रपरिषदेत उपस्थित तज्ज्ञांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी इंडियन सोसायटी आॅफ आर्गन ट्रान्सप्लांटचे अध्यक्ष डॉ. उमेश ओझा, बॉम्बे हास्पिटलचे नेफ्रोलॉजी विभाग प्रमुख डॉ. ए.एल. कृपलानी, वरिष्ठ नेफ्रोलॉजीस्टि डॉ. वी.एल. गुप्ता, डॉ. बी.जी. वाघमारे, मोहन फाउंडेशनचे डॉ. रवि वानखेडे, रोटरी क्लब के डिस्ट्रिक्ट गवर्नर डॉ. निखिल चिब, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. समीर चौबे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. ओझा म्हणाले, दरवर्षी किडनीच्या दीड लाख नव्या रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची गरज भासते. परंतु देशात केवळ पाच ते सात हजार किडनी प्रत्यारोपण होते. डायलिसीस हा स्थायी उपचार नाही. किडनी प्रत्यारोपणच आवश्यक ठरते. एका ब्रेन डेड रुग्णाकडून सात आठ इतर रुग्णांना नवीन जीवन मिळू शकते. (प्रतिनिधी)
उपराजधानीत केवळ ०.३ टक्के अवयवदान
By admin | Published: September 28, 2015 3:18 AM