सुमेध वाघमारे
नागपूर : लाखो गोरगरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त कोरोना रुग्णांसाठी होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. विशेष म्हणजे, मागील १३ महिन्यांत मेयोमध्ये कोरोनाचा १३,३५० रुग्णांमधून ९४८ तर, मेडिकलमधून १४,०९६ रुग्णांमधून ३०९४ रुग्णांना या योजनेचा फायदा झाला. नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर ४,६४,२१४ पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमधून केवळ ४,४४५ रुग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ झाला. याचे प्रमाण ०.९५ टक्के आहे. परिणामी, शासनाला कोट्यवधीचा फटका बसला आहे.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत ९९६ आजारांवर उपचार केले जातात. पंतप्रधान जीवनदायी योजनेतून १२०९ आजारांवर उपचार होतात. दरम्यानच्या काळात योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी नव्याने निविदा काढून ज्या आजारांचा लाभ फारच कमी लोक घेत होते, असे आजार काढून त्यात नवीन आजारांचा समावेश केला. मार्च २०२० पासून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येताच एप्रिल २०२०मध्ये या दोन्ही योजनेत कोरोनाचा समावेश करण्यात आला. या आजाराचे स्वरूप पाहून १५ हजार ते ८५ हजारांपर्यंतचे ‘पॅकेज’ देण्यात आले. परंतु, ही योजना जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचविण्यास प्रशासन मात्र, कमी पडले. आता तिसऱ्या व चौथ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
-३८ पैकी ५ हॉस्पिटलमध्येच कोरोना रुग्णांना लाभ
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत शासकीयसह खासगी मिळून ३८ रुग्णालयांचा समावेश आहे. परंतु, मेयो, मेडिकल, एम्स, लता मंगेशकर हॉस्पिटल व शालिनीताई मेघे या पाचच हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांसाठी ही योजना सुरू आहे. या संदर्भात जिल्हा जनआरोग्य योजनेच्या कार्यालयाने केवळ नोटीस बजावण्याचे काम केले आहे.
-आवश्यक कागदपत्रांचा अभाव
जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेंतर्गत देण्यात आलेले ओळखपत्र किंवा पिवळी किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका व इतरही आवश्यक दस्तावेज ग्राह्य धरले जातात. परंतु, कोरोना रुग्णाला रुग्णालयात भरती करण्यातच नातेवाइकांची दमछाक होत असल्याने ते आवश्यक कागदपत्र सोबत ठेवत नाही. अनेकवेळा रुग्णालयाकडून तशी मागणीही होत नाही. योजनेतील आरोग्य मित्र व त्यांचे वरिष्ठही नातेवाइकांकडून हे कागदपत्र मागवून घेण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे.
:: जिल्ह्यात कोरोनाचे ४,६४,२१४ रुग्ण : योजनेचा लाभ ४,४४५ रुग्णांना
:: मेडिकलमध्ये कोरोनाचे १४,०९६ रुग्ण : योजनेचा लाभ ३०९४ रुग्णांना
:: मेयोमध्ये कोरोनाचे १३,३५० रुग्ण : योजनेचा लाभ ९४८ रुग्णांना