नागपूर : एसटी महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांना केवळ ११ हजार रुपये वेतन मिळते. या तुटपुंज्या वेतनात घरभाडे, मुलांचे शिक्षण, आईवडिलांचे आजारपण कसे करावे, असा संतप्त सवाल करून इतक्या पैशात संसाराचे स्टेअरिंग चालणार तरी कसे, असे म्हणत इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही वेतन द्यावे व शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ३० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. एसटीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्याला केवळ ११ हजार रुपये वेतन मिळते. त्यात १५०० रुपये घरभाडे भत्ता, १०० रुपये धुलाई भत्ता, ७० रुपये रात्रभत्ता मिळतो. या तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अर्धे वेतन मिळत असल्यामुळे या वेतनात घरगाडा चालविणे कठीण होत आहे. कमी वेतन आणि ते सुद्धा वेळेवर मिळत नसल्यामुळे एसटी कर्मचारी संकटात सापडले आहेत. दिवाळीतही एसटी प्रशासनाने केवळ २५०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली. इतक्या कमी बोनसमध्ये दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे एसटीचे शासनात विलीनीकरण केल्यास इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळून ठरलेल्या तारखेला त्यांचे वेतन होणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी जोर धरत आहे.
या आहेत मागण्या
-इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे
-घरभाडे भत्ता, धुलाई भत्ता वाढवावा
-रात्रपाळी भत्ता वाढवावा
-रात्री मुक्कामी गेलेल्या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी
-इतर राज्यांप्रमाणे एसटीला ५ टक्के प्रवासी कर लावावा
-एसटीला टोल टॅक्समधून वगळावे
-एसटी शासनाचा उपक्रम असल्यामुळे डिझेल कर माफ करावा
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे
‘एसटीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना केवळ ११ हजार रुपये वेतन मिळते. इतर शासकीय कार्यालयात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना २६ हजारांवर वेतन मिळते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनाही इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे.’
-एक वाहक