नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना १८ वर्षांवरील सर्वांना मोफत बूस्टर डोसला सुरुवात झाली; परंतु महिनाभराचा कालावधी होऊनही या लसीकरणाला म्हणावा तसा वेग आला नाही. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यातील १४ टक्केच लोकांनी बूस्टर डोस घेतला, तरीही राज्यात पहिले स्थान गाठले आहे.
राज्यात ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स यांच्यासाठी १० जानेवारी २०२२ पासून शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत बूस्टर डोसला सुरुवात झाली, तर एप्रिल महिन्यापासून खासगी केंद्रावर पैसे मोजून १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टरची सोय उपलब्ध करून देण्यात आली. जून महिन्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर १५ जुलैपासून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत बूस्टर डोसची मोहीम हाती घेण्यात आली; परंतु त्याला अपेक्षेपेक्षाही कमी प्रतिसाद मिळत असल्याचे राज्यातील चित्र आहे.
-पहिल्या दहामध्ये भंडारा
राज्यात बूस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये पहिल्या स्थानी नागपूर (१४.०३ टक्के), दुसऱ्या स्थानी मुंबई (१३.५७ टक्के), तिसऱ्या स्थानी पालघर (१२.०४ टक्के), चौथ्या स्थानी ठाणे (११.७१ टक्के), पाचव्या स्थानी रायगड (११.५२ टक्के), सहाव्या स्थानी सातारा (११.५० टक्के), सातव्या स्थानी रत्नागिरी (११.२४ टक्के), आठव्या स्थानी पुणे (११.१९ टक्के) नवव्या स्थानी जळगाव (११.१५ टक्के), तर दहाव्या स्थानी भंडारा (१०.७५ टक्के) आहे.
-विदर्भात बूस्टर डोसला अल्प प्रतिसाद
विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी नागपूर व भंडारा जिल्हा वगळता इतर ९ जिल्ह्यांत बूस्टरला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. १३ व्या स्थानी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात ९.९७ टक्के, १५ व्या स्थानी असलेल्या अकोला जिल्ह्यात ९.८३ टक्के, १६ व्या स्थानी असलेल्या गोंदिया जिल्ह्यात ९.५५ टक्के, २४ व्या स्थानी असलेल्या अमरावती जिल्ह्यात ७.१५ टक्के, २५ व्या स्थानी असलेल्या वर्धा जिल्ह्यात ७.०७ टक्के, २८ व्या स्थानी असलेल्या वाशिम जिल्ह्यात ६.४४ टक्के, तर शेवटच्या पाचमध्ये ३१ व्या स्थानी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ६.०८ टक्के, ३३ व्या स्थानी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात ५.५१ टक्के, तर ३४ व्या स्थानी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात ३.६६ टक्के लोकांनी बूस्टर डोस घेतला.
-राज्यात १० टक्केच लोकांनी घेतला बूस्टर
राज्याची लोकसंख्या जवळपास १२ कोटी ४४ लाख ३६ हजार ९९९ आहे. यातील ७ कोटी ५९ लाख ४६ हजार ३६८ लोक बूस्टर डोसचे लाभार्थी आहेत; परंतु यातील १० टक्केच म्हणजे ७६ लाख ६ हजार ३५० लोकांनी हा डोस घेतला.