नागपूर : मागील अडीच दशकात शहरात बहुमजली इमारतींची संख्या हजारोंनी वाढली असली तरी त्यापैकी फक्त १६.७३ टक्के इमारतींमध्येच आग प्रतिबंधक व नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सक्षम यंत्रणा आहे, असा दावा अग्निशमन विभागाने केला आहे.२७४३ इमारतींच्या अस्थायी एनओसीसाठी अग्निशमन विभागाकडे अर्ज आले होते. त्यापैकी ४५९ इमारतींना विभागाकडून परिपूर्णता (कम्प्लायन्स) प्रमाणपत्र देण्यात आले. नियमानुसार १५ मीटरपेक्षा उंच इमारतींमध्ये अग्निशमन विभागाच्या निकषानुसार आग प्रतिबंधक उपकरणे आणि आपात्कालीन शिडी लावणे आवश्यक आहे. मात्र शहरात या निकषानुसार बांधकाम केले जात नाही. सुरुवातीला बांधकामाच्या वेळी अग्निशमन विभागाकडून अस्थायी एनओसी दिली जाते. बांधकाम पूर्ण झाल्यावर विभागाची चमू पाहणी करते व नंतर परिपूर्णता प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतरच ही इमारत सुरक्षित असल्याचे घोषित केले जाते. पण शहरातील अनेक इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले. पण त्यांच्याकडे अस्थायी एनओसीच आहे.भाजपचे नगरसेवक प्रवीण भिसीकर यांनी महापालिकेच्या आमसभेत अस्थायी एनओसीचा मुद्दा उपस्थित केला होता. सतरंजीपुरा झोनमध्ये येणाऱ्या पंजवानी मार्केटचे प्रकरण उपस्थित केले होते. येथे दोन इमारतींना जोडून एक इमारत करण्यात आली. यापैकी एक महापालिकेच्या तर दुसरी नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकार क्षेत्रात येते. सतरंजीपुरा झोनने याकडे दुर्लक्ष केले.(प्रतिनिधी)
१६ टक्के बहुमजली इमारतीच सुरक्षित
By admin | Published: February 26, 2015 2:19 AM