लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात अद्यापही कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आलेला नसून बाधितांची संख्या वाढते आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत कोविड खाते सुरू करण्यात आले होते. या खात्यात ३ ऑगस्टपर्यंत ५४१ कोटींच्या देणग्या जमा झाल्या. मात्र यातील २५ टक्केच रक्कम कोरोनावरील उपचार व इतर बाबींसाठी खर्च करण्यात आली. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मुख्यमंत्री सचिवालयाकडे विचारणा केली होती. मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड खात्यात किती रकमेच्या देणग्या आल्या व नेमकी किती रक्कम खर्च झाली, राज्यातील किती इस्पितळांना या फंडमधील निधी देण्यात आला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते.
प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, राज्यात २८ मार्च रोजी मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९ हे खाते अस्तित्वात आले. १५ जूनपर्यंत या खात्यात ४२७ कोटी २८ लाख २४ हजार २३ रुपयांची रक्कम जमा झाली होती. तर ३ ऑगस्टपर्यंत हा आकडा ५४१ कोटी १८ लाख ४५ हजार ७५१ इतका झाला होता. यापैकी कोरोनावर १३२ कोटी २५ लाख ८९ हजार ६१० रुपयांची रक्कमच खर्च करण्यात आली. याची टक्केवारी ही २४.४४ टक्के इतकीच होती.कोविड फंडमधून ११ ऑगस्टपर्यंत राज्यातील तीनच इस्पितळांना निधी देण्यात आला. यात मुंबई येथील सेंट जॉर्जेस रुग्णालयाला २० कोटी तर रत्नागिरी व जालना येथील जिल्हा रुग्णालयांना प्रत्येकी १ कोटी ७ लाखांचा निधी देण्यात आला.- नागपूरच्या वाट्याला तुटपुंजी रक्कमनागपूर इस्पितळाला रक्कम देण्यात आलेली नाही असे नमूद करण्यात आले आहे. तर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला ११ ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड-१९ मधून १ कोटी २० लाखांची रक्कम देण्यात आली. नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या २० हजारांहून अधिक झाली आहे हे विशेष.