नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला येत्या शनिवारी २८ दिवस पूर्ण होऊन ‘बुस्टर डोज’ देण्याची आरोग्य यंत्रणेने तयारी सुरू केली आहे. परंतु लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात करोना काळात फ्रंटवर लढलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडूनच लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंगळवारी पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात ६२०० लसीकरणाचे लक्ष्य होते. त्यापैकी ४१ टक्के म्हणजे २५२६ लाभार्थ्यांनी लस घेतली.
नागपूर जिल्ह्यात आज ३२०० लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. परंतु १३०१ लाभार्थीच लसीकरणासाठी पुढे आले. लसीकरणाचे प्रमाण ४१ टक्के होते. विशेष म्हणजे, शहरातील १८ केंद्रांपैकी केवळ तीन केंद्रांवर ५० टक्क्यांवर लसीकरण झाले. मेयो रुग्णालयाच्या केंद्रावर १६ टक्के, डागा रुग्णालयाच्या केंद्रावर १५ टक्के, पीएमएच हॉस्पिटलच्या ‘अ’ केंद्रावर १८ टक्के, आयसोलेशन हॉस्पिटलच्या केंद्रावर ५६ टक्के, ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या केंद्रावर ७० टक्के, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या केंद्रावर २६ टक्के, भवानी हॉस्पिटलच्या केंद्रावर ८ टक्के, किंग्जवे हॉस्पिटलच्या केंद्रावर ३८ टक्के, मेडिकलच्या ‘अ’ केंद्रावर २९ टक्के तर ‘ब’ केंद्रावर २५ टक्के, म्यूर मेमोरियल हॉस्पिटलच्या केंद्रावर १२ टक्के, इंदिरा गांधी रुग्णालयाच्या केंद्रावर ३८ टक्के, पीएमएच हॉस्पिटलच्या ‘ब’ केंद्रावर ४६ टक्के, पोलीस हॉस्पिटलच्या केंद्रावर ३७ टक्के, सीम्स हॉस्पिटलच्या केंद्रावर २८ टक्के, दंदे हॉस्पिटलच्या केंद्रावर ५५ टक्के, कामगार रुग्णालयाच्या केंद्रावर ९ टक्के तर अॅलेक्सीस हॉस्पिटलच्या केंद्रावर ३२ टक्के लसीकरण झाले.
: सर्वाधिक लसीकरण वर्धा जिल्ह्यात
गडचिरोली जिल्ह्याला आज १२०० लसीकरणाचे लक्ष्य होते, त्यापैकी ३३ टक्के म्हणजे ३९९ लाभार्थ्यांनी लस घेतली. पूर्व विदर्भात सर्वात कमी लसीकरणाची नोंद याच जिल्ह्यात झाली. भंडारा जिल्ह्याला ३०० लसीकरणाचे लक्ष्य होते. परंतु त्यापैकी ३५ टक्केच म्हणजे, १०६ लाभार्थ्यांनी लस घेतली. गोंदिया जिल्ह्यात १००० पैकी ४० टक्के, ३९७ लाभार्थ्यांनी लस घेतली. सर्वाधिक लस वर्धा जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घेतली. ५०० पैकी ३२३ म्हणजे ६५ टक्के लाभार्थ्यांनी लस घेतली. चंद्रपूर जिल्ह्यात आज लसीकरण झाले नाही.
जिल्हा लक्ष्य लसीकरण
भंडारा ३०० १०६
गडचिरोली १२०० ३९९
गोंदिया १००० ३९७
नागपूर ३२०० १३०१
वर्धा ५०० ३२३