नागपूर : जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा शासनाचा उद्देश लसीच्या तुटवड्यामुळे पूर्ण होताना दिसून येत नाही आहे. २ मेनंतर तब्बल चार दिवसांनी म्हणजे बुधवारी केंद्राकडून राज्याला नऊ लाख डोस मिळाले. मात्र नागपूर जिल्ह्याच्या वाट्याला केवळ ४५,५०० डोस आले. दोन दिवसानंतर बहुसंख्य लसीकरण केंद्रांना गुरुवारी डोस उपलब्ध झाल्याने गर्दी उडाली होती. शनिवारी पुन्हा २९ हजार डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही दिवस लसीकरण सुरळीत सुरू राहणार असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसून येत आहे. यामुळे लसीकरणाला वेग येऊ पाहत असतानाच विशेषत: कोविशिल्ड लसीचा मोठा तुटवडा पडला. बहुसंख्य लसीकरण केंद्रांवर मागणीनुसार लस उपलब्ध होत नव्हत्या. यामुळे अनेकांवर रिकाम्या हाताने परतण्याची वेळ आली होती. तुटवड्यामुळे दोन दिवस ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी असलेले सर्वच लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी नागपूर जिल्ह्याला ४५,५०० कोविशिल्डचे डोस मिळताच गुरुवारी ९६ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. परंतु सर्वच ठिकाणी गर्दी उसळल्याने गोंधळाचे वातावरण होते. विशेष म्हणजे, ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला. मनपाचे सुरक्षा रक्षक त्यांनाही रांगेत लावत असल्याने वादविवादाला तोंड फुटले होते.
- १८ वर्षांवरील व्यक्तीच्या लसीकरणाची ऑनलाईन नोंदणीही फुल्ल
शहरात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तीचे ‘कोव्हॅक्सिन’चे लसीकरण स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, छाप्रू सर्वाेदय मंडळ हॉल व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या तीन ठिकाणी तर, कोविशिल्ड लसीकरण इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू आहे. या सहाही केंद्रावर थेट नोंदणीची सोय नाही. परंतु मागील तीन दिवसापासून ऑनालाईन नोंदणी फुल्ल झाल्याचे दाखवीत असल्याने युवकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप आहे.
-कोव्हॅक्सिनचे १६ हजार डोस
कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचे सेंटर कमी असल्याने बुधवारी नागपूर विभागाला ६८ हजार डोस मिळाले. यातील नागपूर जिल्ह्याला १६ हजार डोस उपलब्ध झाले. दरम्यानच्या काळात या लसीचाही तुटवडा पडल्याने विशेषत: दुसरा डोस घेणारे लाभार्थी अडचणीत आले होते. परंतु आता गुरुवारपासून सुरळीत लसीकरण सुरू झाले.