योगेश पांडे
नागपूर : प्रत्येकच पक्षाकडून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासंदर्भात मोठेमोठे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात राजकारणातमहिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबत सर्वच ठिकाणी उदासीनता आहे. मागील ६० वर्षात नागपूर शहरातील मतदारसंघांमधून हजाराहून उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढविली. यातील महिला उमेदवारांची संख्या ही केवळ ६३ इतकी ठरली. यातही डॉ. सुशिला बलराज व दमयंतीबाई देशभ्रतार वगळता एकाही महिला उमेदवाराला विधानसभेत पोहोचण्यात यश आले नाही.
१९६२ ते २०२२ या कालावधीत नागपूरने एकूण १३ निवडणुका पाहिल्या. २०१९ पर्यंतच्या उमेदवारांची संख्या ही १ हजार २७ इतकी ठरली. यातील महिला उमेदवारांची संख्या ही केवळ ६३ म्हणजेच ६.१३ टक्के इतकीच ठरली आहे.
१९६२, १९६७ व १९७२ साली लढण्यात आलेल्या पहिल्या तीन निवडणुकांत कॉंग्रेसने डॉ.सुशीला बलराज यांनाच तिकीट दिले होते व मतदारांनीदेखील महिलाशक्तीवर विश्वास टाकला. १९६२ साली नागपूर व त्यानंतर सलग दोनदा पश्चिम नागपूर मतदारसंघातून त्या निवडून गेल्या होत्या. १९७८ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकडून त्या उभ्या झाल्या, मात्र विजयी चौकार मारण्याची त्यांची संधी हुकली. त्यानंतर कॉंग्रेसने १९८५ साली उत्तर नागपुरातून दमयंतीबाई देशभ्रतार यांना तिकीट दिले. आश्चर्याची बाब म्हणजे प्रथमच उत्तर नागपुरात कॉंग्रेसला विजय मिळाला होता. या चार निवडणूका वगळता नागपुरातून एकदाही महिला उमेदवाराला विजय मिळविता आला नाही.
भाजपकडून एकाही महिलेला तिकीट नाही
जनसंघाकडून पहिल्याच निवडणुकीपासून सुमतीताई सुकळीकर यांनी किल्ला लढविला होता. मर्यादित मनुष्यबळातदेखील त्यांनी सलग चार वेळा निवडणूक लढविली. यात १९६२ साली नागपूर मतदारसंघ व त्यानंतर १९६७, १९७२ व १९७८ (जनता पार्टी)मध्ये नागपूर पश्चिममधून त्या उभ्या राहिल्या. परंतु चारही वेळा त्यांना विजयश्रीने हुलकावणीच दिली. त्यानंतर भाजपची स्थापना झाली व भाजपने एकाही महिला उमेदवाराला शहरातून आजपर्यंत तिकीट दिलेले नाही.
सर्वाधिक उमेदवारी पश्चिम नागपुरातून
१९६२ साली नागपूर, नागपूर-१, नागपूर-२, नागपूर-३ असे मतदारसंघ होते. १९६७ साली मतदारसंघांना नावे मिळाली. त्यामुळे १९६७ पासूनच्या आकडेवारीकडे लक्ष टाकले असता पश्चिम नागपुरात आतापर्यंत २१ महिला उमेदवारांनी आव्हान दिले तर उत्तर नागपुरातून २० महिला उमेदवार उभ्या झाल्या. दक्षिण नागपूर (७), मध्य नागपूर (८), दक्षिण-पश्चिम नागपूर (३) व पूर्व नागपूर (१) अशी आकडेवारी राहिली आहे.
सर्वाधिक आव्हान अपक्ष स्वरूपात
राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी हव्या त्या प्रमाणात महिलांना उमेदवारी दिली नसल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसने चार वेळा महिलांना उमेदवारी दिली तर जनसंघाने तीनदा महिलांवर विश्वास टाकला होता. जनता पार्टीने एकदा उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व बसपने दोन महिलांना आतापर्यंत संधी दिली आहे. ३५ अपक्ष महिलांनी आव्हान उभे केले तर इतर पक्षांनी १७ महिलांना उमेदवारी दिली.
मतदारसंघनिहाय महिला उमेदवार (१९६७ ते २०१९)
मतदारसंघ महिला उमेदवार
दक्षिण-पश्चिम नागपूर - ४
दक्षिण नागपूर - ७
पश्चिम नागपूर - २१
मध्य नागपूर - ८
उत्तर नागपूर - २०
पूर्व नागपूर - १