लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आज २५ एप्रिल रोजी केवळ ३०९ दलघमी(९ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात केवळ २२ दलघमी म्हणजे २ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ २९ टक्के पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीसमध्ये १० टक्के, लोवर नांद ३ टक्के, वडगाव प्रकल्पात २१ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात २३ टक्के, सिरपूर २२ टक्के, पुजारी टोला २३ टक्के, कालिसरार ५१ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये १४ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३२ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १४ टक्के, धाममध्ये १० टक्के, पोथरामध्ये २ टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ७ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ मध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.मध्यम व लघु प्रकल्पांची स्थितीही बिकटनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारचे धरण आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७.५८ दलघमी इतकी आहे. त्यात १८ एप्रिल रोजीपर्यंत केवळ १०७.७२ दलघमी म्हणजेच २० टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ६४ दलघमी म्हणजेच १३ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.मे मध्ये परिस्थिती भयावह होणारनागपूर विभागातील धरणांमध्ये आताच पाणी शिल्लक नाही. अनेक धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या कडक उन्हात परिस्थिती आणखीनच भयावह होण्याची शक्यता आहे.