लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधींचे वागणे कधी कधी किती बालिशपणाचे असते, याची प्रचिती समाजकल्याणच्या बैठकीत आली. बैठकीत जेवण नसल्यामुळे उपस्थित सदस्यांनी ड्रायफ्रूटचा आग्रह धरला. अखेर कसेबसे ड्रायफ्रूट आले आणि सदस्य शांत झाले. परंतु हे ड्रायफ्रूट प्रकरण जिल्हा परिषदेत चांगलेच चर्चेला आले.
जिल्हा परिषदेत दहा विषय समित्या आहेत. प्रत्येक समित्यांची साधारणत: महिन्यातून एकदा बैठक होते. यात विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा होऊन त्या विषयांना मार्गी लावण्याबाबत येथे चर्चा होणे अपेक्षित असते. परंतु अनेकदा बैठकीत वायफळ विषयावर चर्चा होते. समाजकल्याण समितीच्या बैठकीत अशीच झालेली वायफळ चर्चा चांगलीच रंगत आहे. बैठकीला सदस्यांसोबत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. समिती सभापती नेमावली मोटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. बैठक सुरू होताच काही सदस्यांनी नाश्त्याचा विषय काढला. कोरोनामुळे नाश्ता न बोलावता, चहा, बिस्कीटचा मेन्यू ठेवण्यात आला होता. बैठकीला येणारे समिती सदस्य जिल्ह्यातील विविध भागातून येत असतात. काही सदस्य जेवण न करताच बैठकीला आले पण बैठकीत जेवण तर नाही, पण नाश्ताही नसल्याने काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यातच एका महिला सदस्याने नाश्त्याऐवजी ड्रायफ्रूट मागवा असा आग्रह धरला.