योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसाधारणत: पदवीधर मतदारसंघ म्हटला की जनतेच्या डोळ्यासमोर उच्चशिक्षित उमेदवार असल्याचे चित्र येते. मात्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात रिंगणात उतरलेल्यांमध्ये उच्चविद्याविभूषित उमेदवारांची कमतरता आहे. केवळ एकच उमेदवार ‘पीएचडी’ असून, ३८ टक्के उमेदवारांकडे एकच पदवी असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे अर्धे उमेदवार हे व्यावसायिक आहेत. निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. एकूण उमेदवारांच्या शैक्षणिक इतिहासाकडे लक्ष टाकले असता, रिंगणात एक वैद्यकीय तज्ज्ञ व एक ‘पीएचडी’धारक आहे. ३८.८९ टक्के उमेदवारांकडे केवळ एकच पदवी आहे, तर ३३.३३ टक्के उमेदवारांचेच पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.
२२ टक्के उमेदवार शिक्षण क्षेत्रातीलपदवीधर मतदारसंघात शिक्षण क्षेत्रातील मतदारांचे प्रमाण मोठे आहे. मात्र प्रत्यक्षात रिंगणात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले केवळ २२ टक्के उमेदवारच आहेत. ५० टक्के उमेदवारांचा काही ना काही व्यवसाय आहे, तर १६.६७ टक्के उमेदवार वकिली करतात.
तरुणतुर्कांचा बोलबालाएकूण उमेदवारांपैकी ३३.३३ टक्के उमेदवार हे ४५ किंवा त्याहून कमी वयाचे आहेत. तर पन्नाशीहून कमी वय असलेल्यांची टक्केवारी ७७.७८ टक्के इतकी आहे. केवळ ११.११ टक्के उमेदवार हे साठीच्या पुढील आहेत.