योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विद्यापीठाने बृहत् आराखड्यात २०२४ पर्यंत ८२ टक्के महाविद्यालये ‘नॅक’च्या श्रेणीत आणण्याचे ध्येय मांडले आहे. मात्र महाविद्यालयांकडूनच या संकल्पाला छेद देण्यात येत आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ आठ महाविद्यालयांना नॅकची ए प्लस ही श्रेणी प्राप्त आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या विद्यापीठाच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बाब आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ५०७ पैकी केवळ ३० टक्के महाविद्यालयेच सद्यस्थितीत नॅकच्या श्रेणीत आहेत. १५२ महाविद्यालयांपैकी केवळ १.५८ टक्के महाविद्यालये नॅकच्या ए प्लस श्रेणीत येतात तर २६ महाविद्यालये ए श्रेणीत आहेत. यात प्रामुख्याने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेशी संबंधित महाविद्यालयांचा समावेश आहे.
एकाही महाविद्यालयाला सर्वोच्च श्रेणी नाही
महाविद्यालयांमधील सोयी, पायाभूत सुविधा, शिक्षणाचा दर्जा, संशोधनाची व्याप्ती, शिक्षकांची कामगिरी इत्यादींच्या आधारावर नॅकच्या चमूकडून मू्ल्यमापन करण्यात येते व प्राप्त सीजीपीएच्या आधारावर विविध श्रेणी देण्यात येतात. ए प्लस प्लस ही सर्वोच्च श्रेणी मानली जाते. परंतु नागपूर विद्यापीठातील एकाही महाविद्यालयाला ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त नाही.
सर्वाधिक महाविद्यालये नागपूर जिल्ह्यातील
नागपूर जिल्ह्यातील सर्वात जास्त ११५ महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झाले आहे. सात महाविद्यालयांना ए प्लस ही श्रेणी प्राप्त आहे. २३ महाविद्यालयांना ए, २० महाविद्यालयांना बी प्लस प्लस ती ४० महाविद्यालयांना बी श्रेणी प्राप्त आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात कमी महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झाले असून ही संख्या केवळ सहा इतकी आहे.
श्रेणीनिहाय महाविद्यालये
नॅकची श्रेणी - महाविद्यालयांची संख्या
ए प्लस प्लस - ०
ए प्लस - ८
बी प्लस प्लस - २२
बी प्लस - २०
बी - ५६
सी - १६
जिल्हानिहाय महाविद्यालये
जिल्हा - विविध श्रेणी असलेली महाविद्यालये
नागपूर - ११५
वर्धा - २२
गोंदिया - ९
भंडारा - ६