आशिष दुबे -
नागपूर: कोणत्याही संघटनेत किंवा देशामध्ये स्वत:च्या बजेटवर जीडीपीचा ५ % भाग आरोग्य सेवेवर खर्च करणार नाही तोपर्यंत तुम्ही व्यवस्था ठीक करू शकत नाही. आरोग्य चांगले राहिले तरच अर्थव्यवस्था चांगली राहील, असे स्पष्ट मत सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केले. त्यांनी डॉक्टर व सर्व सेवाभावी संघटनांना लोकांची मदत करण्यासह त्यांच्या मनातील भीती दूर करण्यावर जोर देण्याचे आवाहन केले. त्यांना काही होणार नाही, हा विश्वास निर्माण करा. तेव्हाच समाजाची मदत करता येईल. त्यांनी ‘जितो’च्या उपक्रमाची प्रशंसा केली व या उपक्रमाने लोकांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्यात विश्वास निर्माण होईल. हेल्पलाइन चांगली गोष्ट आहे व तिचा सांभाळून उपयोग करावा लागेल. अनेकांनी हेल्पलाइन सुरू केली पण त्यांच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. चांगले करणाऱ्यांची चर्चा होत नाही. मात्र, जराही चूक झाली की त्याचा आवाज मोठ्याने होतो. केवळ ‘जितो’ नाही तर प्रत्येक संघटनेच्या चांगल्या कामासोबत आम्ही २४ तास उभे राहू, असा विश्वास त्यांनी दिला.‘लोकमत’ आणि सेवाभावी संघटना ‘जितो रोम जाेन’ यांच्या वतीने आयोजित एका ऑनलाइन कार्यक्रमात ‘जितो कोविड हेल्पलाइन’चे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात आयएमए, नवी दिल्ली राष्ट्रीय महासचिव डॉ. जयेश लेले, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे (मुंबई), लोकमत मीडिया प्रा.लि.चे महाप्रबंधक मिलिंद दर्डा, जितो अपेक्सचे चेअरमन गणपतराज चौधरी (अहमदाबाद), व्हाइस चेअरमन विजय भंडारी (पुणे), अध्यक्ष सुरेश मुथा (चेन्नई), उपाध्यक्ष पारस भंडारी (बंगळुरू), महासचिव हितेश दोशी (गोरेगाव, मुंबई), जितो प्रोफेशनल फोरमचे चेअरमन अजय बोहोरा (नाशिक) व डायरेक्टर इनचार्ज मिलिंद शाह (नाशिक), रोम जोनचे चेअरमन कांतिलाल ओसवाल (पुणे), मुख्य सचिव अजय मेहता (पुणे) व कार्यक्रम समन्वयक डॉ. राजन संचेती, जितो अध्यक्ष ओमप्रकाश रांका (पुणे), जितो प्रोफेशनल फोरमचे झोन प्रोजेक्ट समन्वयक डॉ. अतुल जैन (नाशिक) प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात जेएलडब्ल्यू जोन समन्वयक पुणेच्या संगीता ललवानी-रुनवाल यांनी दर्डा यांचा परिचय दिला. विजय दर्डा म्हणाले, ही हेल्पलाइन कोरोना संक्रमित रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य वाढविण्यात व योग्य मार्गदर्शन करण्यात सहायक ठरेल. कोरोनामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. सतत वाढणारी संक्रमितांची संख्या आणि मृत्यू हे भीतीचे प्रमुख कारण आहे. यापासून बचावासाठी लसीकरण हे परिणामकारक आहे. मात्र, लसींचा तुटवडा सर्वत्र दिसून येत आहे. लस मिळत नसल्याने लोकांमध्ये संभ्रम व भीती निर्माण होत आहे. एक वेळ अशी होती की आपल्या देशात लस निर्माता कंपन्या उभ्या होत्या. त्यांना मंजुरीची आवश्यकता होती. मात्र, त्याकडे लक्ष दिले गेले नाही. अमेरिकेने संपूर्ण देशात लसीकरण पूर्ण केले. वर्तमान परिस्थितीत हेल्पलाइन अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडेल. हेल्पलाइन सुरू करताना मानवता कायम ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाला वेळेवर मदत मिळेल, हे निश्चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल आणि त्यांच्यात विश्वास निर्माण होईल, अशी भावना दर्डा यांनी व्यक्त केली. लोकमत परिवार जितो संघटनेच्या कार्यात २४ तास सोबत राहील, असा विश्वास त्यांनी दिला. रोम जोनचे चेअरमन कांतिलाल ओसवाल यांनी स्वागत भाषण केले. जितो प्रोफेशनल फोरमचे चेअरमन अजय बोहोरा यांनी फोरम आणि संघटनेची माहिती दिली. ऑनलाइन कार्यक्रमाचे संचालन मिलिंद शाह यांनी केले. अतुल जैन यांनी आभार मानले.लोकमत व जितो रोम जोनतर्फे होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या जितो कोविड हेल्पलाईनची मदत मिळविण्यासाठी मोबाईल क्रमांक ९३२४९८२०२० यावर ‘Hi’ टाईप करून व्हॉट्सअप करावा. हेल्पलाईन सेवा सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहील. या क्रमांकावर कुणीही कॉल करू नये.
योजना अमलात आणणे महत्त्वाचेसुरेश मुथा म्हणाले, जेव्हा आपण समस्येने ग्रासलेले असतो, तेव्हा मेंदू त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करीत असतो. विचार करणे व ते मिळविणे या वेगळ्या गोष्टी आहेत. महत्त्वाचे आहे ते विचारांना अमलात आणणे. भविष्यात आणखी जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही तयार आहोत. हा उपक्रम काळाची गरज आहे. या संकटकाळी लोकांची मदत करणे व त्यांना मार्गदर्शन करणे महत्त्वाचे कार्य आहे.
देण्याची वृत्ती असायला हवी -दर्डा म्हणाले, जेव्हा जेव्हा जैन शब्दाचा उल्लेख होतो, तेथे सेवेची गोष्ट केली जाते. जेव्हा सेवेची गोष्ट होते तेव्हा दान किंवा पैशाची गोष्ट केली जात नाही तर वृत्तीवर भर दिला जातो. वृत्ती अशी असावी जी सर्वस्व अर्पण करायला तयार होईल. ‘लोकमत’ने नेहमीच ज्यांनी सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले अशा लोकांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. ससून रुग्णालयाचे डॉ. रोहिदास बोडसे, कोल्हापूरचे जफरबाबा सैय्यद, मुंबई मनपाची एक महिला कर्मचारी, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईचे डॉ. सिद्धेश्वर बिराजदार किंवा २५० पेक्षा अधिक कोरोना संक्रमित गर्भवती महिलांची सुरक्षित प्रसूती करणाऱ्या नागपूरच्या डॉ. अलका पाटणकर-जतकर, तसेच पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना सन्मानित केल्याचे त्यांनी सांगितले.
एमएमसीची परवानगीकार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र मेडिकल काउंसिल (एमएमसी) चे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सध्याच्या काळात हेल्पलाईन वेळेची गरज असल्याचे सांगितले. ती अशावेळी सुरू होत आहे ज्यावेळी त्याची खरोखर गरज आहे. केसेस वाढत असल्याने मेडिकल स्टॉफवर तणाव वाढत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मेडिकल स्टाफ कमी आहे. ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा अधिक कमी लक्षणवाले किंवा लक्षण नसणारे आहेत. मात्र भीतीमुळे त्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागत आहे. संपूर्ण हेल्थ केअर सेक्टरसाठी हे १४ महिने अत्यंत कठीण ठरले आहेत. तिसरी लाटही अतिशय कठीण राहणार आहे. आशा आहे की आपण सर्व विषाणूसोबत सुरू असलेले युद्ध जिंकू. काउंसिल व संघटन प्रत्येक मदतीसाठी तयार आहेत. कायद्यानुसार संघटन ऑनलाईन कंसल्टेशनसाठी अधिकृत नाही; पण काउंसिलची पूर्ण परवानगी राहील, असे ते म्हणाले.
तणाव वाढला आहेडॉ. जयेश लेले यावेळी म्हणाले, लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे स्पष्ट केले. ते दूर करण्यात हेल्पलाईन महत्त्वाची ठरेल. रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. त्यांना दिलासा मिळेल. तिसऱ्या लाटेशी निपटण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. लोकांना मार्गदर्शन मिळेल.
हसत राहा, हसवत राहा -दर्डा म्हणाले, या काळात आपण सर्वांनी हास्य विसरल्यासारखे वाटते आहे. मात्र आपल्या सर्वांना हसत राहण्याची गरज आहे. आपल्याला हसविणारा दुसरा कुणी नाही तर आपला मित्र असतो, ज्याच्याशी दिलखुलास बोलू शकतो. बेधडक त्याच्याशी बोलता येते. हसत व हसवत राहिल्याने मेंदूचे केमिकल बदलून जाते.
सरकारला खडे बोल-दर्डा यांनी राज्य सरकारला कठोर प्रश्न विचारले. एखाद्या खासगी रुग्णालयात दुर्घटना घडली तर तेथील डॉक्टर, संचालक व स्टॉफवर कारवाई केली जाते. त्यांना पोलिसांकडून तत्काळ अटक होते. मात्र शासकीय रुग्णालयात काही झाल्यास दुर्लक्ष केले जाते. असे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी भंडारा, मुंबई व नाशिक येथील घटनांचा उल्लेख केला.
समाजाचे कार्य प्रेरणादायीदर्डा यांनी जैन समाजाच्या या सेवाभावी संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली. संघटनेचे कार्य खऱ्या अर्थाने इतर संघटना व लोकांसाठी प्रेरणादायी ठरावे, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यांचे हे कार्य लिखित दस्तावेजाच्या रूपात सर्वांसमोर आले पाहिजे. कॉफी टेबल बुक बनविले जावे. ते केवळ जैन समाजालाच नाही तर इतर समाजालाही प्रोत्साहित करेल व प्रेरणा देईल.
महामारीशी लढण्याचा मंत्र कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन, नियंत्रण, समर्पण व संयम अत्यंत आवश्यक आहे. याच जोरावर कोरोनाच नाही तर कोणत्याही मोठ्यात मोठ्या संकटावर मात करता येते. कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या मृत्यूमागे नियोजनाचा अभाव हे प्रमुख कारण होते. नियोजनाचा अभाव व भीतीमुळे स्थिती या स्तरापर्यंत पोहोचली.
११ लाखांच्या मदतीची घोषणाजितो अपेक्सचे चेअरमन गणपतराज चौधरी म्हणाले, हेल्पलाईन काळाची गरज आहे. याद्वारे मेडिकल स्टॉफ व इन्फ्रास्ट्रक्चरवर वाढलेला तणाव कमी करण्यास मदत होईल. डॉक्टरांच्या मदतीसाठी आयएमएच्या सहकार्याने हा पुढाकार घेतला जात आहे. यासाठी ११ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली.