कारगिल विजयदिन विशेष
नागपूर : कारगिल युद्ध सुरू झाले तेव्हा आमची ड्युटी ॲम्नेशन (दारूगाेळा) डेपाेमध्ये हाेती. आम्ही प्रत्यक्ष युद्धात सहभागी नव्हताे; पण ताे थरार प्रत्यक्ष पाहिला आहे. आपल्या सैनिकांपर्यंत दारूगाेळा पाेहोचविणे ही आमची जबाबदारी हाेती व ताे वेळेत पाेहचावा, यासाठी आमची धडपड हाेती. सुभेदार मेजर शेषराव मुराेडिया यांनी कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला.
सुभेदार मुराेडिया हे १९९४ पासून अनंतनाग जिल्ह्यात ॲम्नेशन डेपाेमध्ये हाेते. त्यानंतर २००१ ते २००३ पर्यंत श्रीनगरच्या खुनमू येथे राेड सर्चिंगच्या ड्युटीवर हाेते. २००४ ते २००६ पर्यंत कुपवाडा तर २००८ पर्यंत बारामुला येथे राेड सर्चिंगमध्ये तैनात हाेते. कारगिल युद्धाच्या वेळी ते अनंतनाग डेपाेमध्ये तैनात हाेते. पुलगाव डेपाेमधून दारूगाेळा घेऊन हायग्राउंडपर्यंत पोहोचविणे ही जबाबदारी हाेती. त्यावेळी सहसा रात्रीच हा प्रवास करावा लागत हाेता. हा साठा पाेहोचविताना अनेकदा धाेकादायक स्थितीचा सामना करावा लागला. युद्धकाळात एकदा अतिरेक्यांनी दारूगाेळा भरलेली गाडी उडविण्याचा कट रचला हाेता. मात्र राेड सर्चिंग टीमच्या सतर्कतेमुळे आम्ही बचावल्याचे मुराेडिया यांनी सांगितले. या संपूर्ण महिनाभराच्या काळात चालकांची झाेप हाेत नव्हती. पण आपल्या जवानांपर्यंत शस्त्रसाठा पाेहोचविणे ही एकच जिद्द मनात राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जखमी सैनिकांना रुग्णालयांपर्यंत आणि शहीद सैनिकांना त्यांच्या निश्चित स्थळी पाेहोचविणे ही जबाबदारीही हाेती. आपल्या जवानांची ही दृश्ये आठवताना आजही अंगावर काटा उभा राहत असल्याची भावना सुभेदार मुराेडिया यांनी व्यक्त केली.