लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल या भंडारा- गोंदियातून लोकसभेच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, पटेल यांनी या चर्चेला एकप्रकारे पूर्णविराम दिला आहे. माझ्या कुटुंबातून फक्त मीच लढणार, माझ्याशिवाय कुणीही लढणार नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे.पटेल हे बुधवारी नागपूरहून दिल्लीसाठी रवाना झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. उमेदवारासंदर्भात त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, याबाबत पक्षाने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, एवढे निश्चित आहे की माझ्याशिवाय माझ्या कुटुंबातील कुणीही निवडणूक लढणार नाही. आपण सध्या राज्यसभेचे सदस्य आहोत. बराच कार्यकाळ शिल्लक आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय आपण पक्ष नेतृत्वावर सोडला आहे. पक्षाकडून मिळालेल्या आदेशाचे पालन केले जाईल.पटेल हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. मोदी लहरमध्ये २०१४ च्या निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना राज्यसभेवर पाठविले. दरम्यान, त्यांना पराभूत करणारे नाना पटोले यांनी भाजपाला रामराम करीत खासदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी झाले.