गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा करीत सात-आठ वर्षांत हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. मात्र, मागील साडेचार वर्षांत या प्रकल्पावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. बहुसंख्य प्रकल्प रखडलेले आहेत. आठ महिन्यावर महापालिकेची निवडणूक असल्याने विकास प्रकल्पावर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता या बैठकांतून फारसे काही निष्पन्न होणार नसल्याने प्रकल्प कागदावर राहण्याची शक्यता आहे.
स्मार्ट सिटी, नाग नदी पुनरुज्जीवन व प्रदूषण निर्मूलन, सिवरेज प्रकल्प, तलाव संवर्धन, जुना भंडारा रोड रुंदीकरण, ऑरेंज सिटी स्ट्रीट, तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोड, महाल व बुधवार बाजार येथील व्यावसायिक संकुल निर्माण, अखंडित पाणीपुरवठा, अशा मोठ्या प्रकल्पांसह अन्य प्रकल्पांचा यात समावेश आहे. आर्थिक स्थिती विचारात घेता, महापालिकेला या प्रकल्पातील आपला आर्थिक वाटा उचलणे अवघड आहे.
समिती गठित झाली, पण प्रकल्पांना गती नाही
शहर विकासासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी महापालिकेत माजी महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. अनेक प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर प्रस्तावित आहेत. समितीने बैठका व आढावा घेण्याचे काम केले. पण प्रकल्पांना गती मिळालीच नाही.
सरकारकडे पाठपुरावाच नाही
दोन वर्षांपासून कोरोनामुळे शहरातील विकासकामे ठप्प आहेत. यातील अनेक प्रकल्प राज्य सरकारकडे प्रलंबित असून, त्यांचा पाठपुरावा करण्यात आला नाही. महापालिकेने काही दिवसापूर्वी एका अधिकाऱ्याची फक्त प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी नियुक्ती केली आहे.
असे आहेत रखडलेले प्रकल्प
- स्मार्ट सिटी प्रकल्पातील यातील सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्प वगळता प्रोजेक्ट टेंडरशुअर व प्रोजेक्ट होम-स्वीट-होम प्रकल्प
- नाग नदी पुनरुज्जीवन व प्रदूषण निर्मूलन प्रकल्प
- गांधीसागर, फुटाळा, पांढराबोडी, सक्करदरा, सोनेगाव, नाईक तलावांचे संवर्धन.
- जुना भंडारा रोड रुंदीकरणाचा प्रकल्प
- ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प
- तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोड
- शहरातील महाल व सक्करदरा बुधवार बाजार बाजाराचा विकास
- शहराला २४ बाय ७ पाणीपुरवठा प्रकल्प, २०१८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.
- ११५० कोटीचा सिवरेज प्रकल्प
- महाल येथील टाऊन हॉल निर्माण, नवीन गांधीबाग झोन कार्यालय
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक