लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्य विभागाला कोविशिल्ड लसीचे मागील आठवड्यात जवळपास साडेतीन लाख डोस मिळाले. परंतु कोव्हॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध झाला नाही. यामुळे मेडिकलवगळून इतर कोव्हॅक्सिन लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. त्या जागी कोवीशिल्ड लस देणे सुरू आहे. सध्या मेडिकलमध्ये एक दिवस पुरेल, ११०० डोस शिल्लक आहे. त्यामुळे लसअभावी बुधवारपासून हे लसीकरण केंद्रही बंद होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने २६ मार्च रोजी ‘कोव्हॅक्सिन लसीचा तुटवड्याची शक्यता’ व ३१ मार्च रोजी ‘मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा’ बातमी प्रकाशित करून वास्तव मांडले होते. त्यानंतरही शासनाकडून कुठल्याही हालचाली झाल्या नसल्याचे दिसून येत आहे.
शहरात ८० केंद्रांतून लसीकरण होते. तीन दिवसांपूर्वी त्यात कोव्हॅक्सिनचे सहा केंद्र होते. मेडिकलमध्ये दोन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, विवेका हॉस्पिटल, हंसापुरी आयुर्वेदिक डिस्पेन्सरी व महाल डायग्नोस्टिक सेंटर येथे प्रत्येकी एक केंद्र होते; परंतु शनिवारपासून कोव्हॅक्सिनचा तुटवडा पडल्याने मेडिकल सोडून सर्वच केंद्रांवर कोविशिल्ड लसीकरण सुरू करण्यात आले. मेडिकलच्या केंद्रावर मागील दोन दिवसांपासून ४५ खालील फ्रंट लाईन वर्करला वगळून लसीकरण केले जात आहे. रविवारी दुसऱ्या डोससाठी आलेल्या ज्येष्ठांनाही तेथील डॉक्टरांनी घरी पाठविल्याच्या तक्रारी आहेत. आता केवळ मेडिकलमध्ये ११०० डोस उपलब्ध असून ते मंगळवारपर्यंत चालतील, असा अंदाज आहे.
जिल्हात लसीकरणाचा उच्चांक, ३४ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण
कोव्हॅक्सिन लसीचा तुटवडा असला तरी कोविशिल्ड लसीचा साठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढला आहे. सोमवारी नागपूर जिल्ह्यात ३४,९६८ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. लसीकरणाचा हा उच्चांक आहे. विशेष म्हणजे, शहरच्या तुलनेत ग्रामीणमध्ये अधिक लसीकरण झाले. २५,१७४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर, शहरात ९,७९४ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले.