नागपूर : वाढत्या तापमानासोबतच नागपूरकरांचा पर्यटनाकडे ओढा वाढला आहे. थंड हवेच्या ठिकाणांसह पर्यटक गोव्याकडे मोठ्या संख्येने जात आहेत. नागपुरातून थेट गोव्याकडे जाण्यासाठी इंडिगो कंपनीचे केवळ एक विमान असल्यामुळे पर्यटकांची निराशा होत आहे. प्रवासी संख्या जास्त असल्यामुळे नागपुरातून थेट गोव्याकडे जाण्यासाठी आणखी विमाने सुरू करण्याची ट्रॅव्हल्स एजन्सींची मागणी आहे.
इंडिगोचे नागपूर-गोवा विमान रात्री ८.२० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट उड्डाण भरून रात्री ९.५५ वाजता गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचते. केवळ एकच थेट विमान असल्यामुळे कंपनी एका तिकिटाचे ७ ते १० हजार रुपयांपर्यंत भाडे आकारते. विमानांची संख्या वाढल्यास भाडे कमी होईल आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढेल, असा ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकांना विश्वास आहे.
नागपुरातून दररोज २६ उड्डाणे १२ शहरांना जोडते. इंडिगो आणि एअर इंडिया या विमान कंपन्या प्रवाशांना सेवा देते. नागपूरहून मुंबईकडे दररोज ५ विमाने जातात. दिल्लीकडे ५, पुणे, ३, हैदराबाद २, गोवा १, कोलकाता १, बेंगळुरू २, अहमदाबाद १, लखनऊ १, नाशिक १, इंदूर २, किसनगढ १ अशा विमानसेवा आहेत. तसेच बेळगावकरिता आठवड्यात सोमवार, मंगळवार, गुरुवार, रविवार अशी चार दिवस उड्डाणे आहेत. तसेच अजमेर जाणाऱ्यांसाठी किसनगढचे एक विमान असून ते आठवड्यात सोमवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशा चार दिवस सेवा आहेत.
कंपन्या अचानक वाढविते भाडेविमान कंपन्या प्रवाशांची संख्या वाढताच संबंधित विमानाचे भाडे अचानक वाढविते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच उन्हाळ्यात आवडत्या ठिकाणांवर विमानाने जाण्यासाठी पर्यटकांच्या खिशावर ताण येत आहे. विमानांची संख्या जास्त राहिल्यास प्रवाशांवर आर्थिक बोझा पडणार नाही. तसे पाहता नागपुरातून वाढत्या प्रवासी संख्येनुसार विमानांची संख्या फारच कमी असल्याचे ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकांचे मत आहे. या कारणांमुळे भाडे वाढवून कंपन्या पर्यटकांचा खिशा रिक्त करीत आहे. नागपुरातून गोव्याकडे जाण्यासाठी केवळ एकच विमान असल्यामुळे पर्यटकांची निराशा होत आहे