नागपूर : दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत असून सुरक्षा यंत्रणेवरील ताणदेखील वाढतो आहे. सोबतच कोराडी, कामठी येथील पोलिस ठाणेदेखील नागपूर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत आली आहेत. याशिवाय शहरात नियमितपणे व्हीव्हीआयपी मान्यवरांचे येणे-जाणे असते. या पार्श्वभूमीवर रिक्त पदांवर लवकरात लवकर कर्मचारी प्रत्यक्ष रूजू कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सूत्रांनी दिलेल्या आकडेवारीनुसार शहरात सद्य:स्थितीत सरासरी साडेतीनशे लोकांमागे एक पोलिस आहे.
पोलिसांच्या आकडेवारीनुसार नागपूर शहरात ८ हजार ५५३ मंजूर पदे आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यानंतर नागपुरातच सर्वांत जास्त पोलिसबळ आहे. नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे अप्पर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी होती. काही आठवड्याअगोदर त्यांची अमरावती पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली. त्यांच्याजागेवर अद्याप कुणाही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे १० पोलिस उपायुक्तांची पदे आहेत. यातील एक जागा रिक्त होती. मात्र, आता तेथे अर्चित चांडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सद्य:स्थितीत पोलिस भरती सुरू असून एकूण ४२९ पदांसाठी भरती सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने भरती प्रक्रिया लांबली. त्यातील निकाल जाहीर होऊन नेमके निवडलेले उमेदवार प्रत्यक्ष रूजू कधी होतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण
नागपूर शहराची लोकसंख्या वाढत असल्याने सुरक्षेचे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यामुळे कामाचा ताण वाढतो आहे. विशेषत: सणासुदीच्या दिवसांमध्ये तर बंदोबस्ताची जबाबदारी वाढते व त्यातून अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचे चित्र आहे.