लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक किंवा सहायक मोटार वाहन निरीक्षकांना वर्षातून काही महिने कार्यालयातील कामकाज, सीमा तपासणी नाके व वायुवेग पथकाची जबाबदारी सांभाळावी लागायची. परंतु यात अधिकाऱ्याच्या कामकाजाचे परीक्षण करणे, जबाबदारी निश्चित करणे, कामाचे नियोजन करणे, कामकाजाचे वाटप करणे व कामातील नैपुण्य प्राप्त होत नसल्याची कारणे देत परिवहन विभागाने वर्षभरासाठी एकच काम, असा ‘फॉर्म्युला’ काढला आहे. परंतु संपूर्ण वर्ष एकच काम करावे लागणार असल्याने या निर्णयाला घेऊन निरीक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.राज्यभरातील सर्वच आरटीओ कार्यालयांमध्ये मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांना वर्षातील काही महिने किंवा दिवस ठरवून दिल्यानुसार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार चक्राकर पद्धतीने काम करावे लागायचे. जसे एका निरीक्षकाला महिन्याभरासाठी वाहन परवाना व नवीन वाहन नोंदणी करावी लागायची, दुसऱ्या महिन्याला योग्यता प्रमाणपत्र देण्याचे कामकाज सांभाळावे लागायचे, तिसऱ्या महिन्याला सीमा तपासणी नाके तर चौथ्या महिन्याला वायुवेग पथकाची जबाबदारी सांभाळावी लागायची. परंतु या कामकाजात बऱ्याच उणिवा असल्याचे परिवहन आयुक्तांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार या कार्यपद्धतीमुळे कार्यालयातील एखाद्या कामकाजाबाबत अधिकाऱ्याचे कामकाजाचे परीक्षण करणे सुलभ होत नाही, अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करणे अवघड होते, दैनंदिन नेमणुकीबाबत अधिकाऱ्याच्या मनात अनिश्चितता येऊ शकते, कामाचे नियोजन करणे अशक्य होऊ शकते, कमी कालावधीच्या कामकाजामुळे एखादे कामकाज कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे याबाबत संबंधित संस्थांना माहिती मिळणे अडचणीचे जाते, कार्यालय प्रमुखास रोजच्या कामकाजाचे वाटप एक दिवस आधी करावे लागते, कार्यालयात संगणक प्रणालीचा वापर होत असल्याने व अनेकवेळा तांत्रिक अडचण येत असल्याने आणि याच दरम्यान दुसऱ्या कामकाजाची जबाबदारी आल्यास योग्य रीतीने त्याचे निराकरण होत नसल्याने वर्षभरासाठी एकच कामाचा निर्णय घेण्यात आला आहे. यात आता एका वर्षासाठी निरीक्षकाला मोटार वाहन परवाना व नवीन वाहन नोंदणीचे काम करावे लागणार आहे. दुसऱ्या वर्षाला वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्राचे कामकाज पहावे लागणार आहे, तिसऱ्या वर्षाला वायुवेग पथक व सीमा तपासणी नाक्याची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.