नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात यंदा हटके राहणार आहे. पूर्ण अधिवेशनात विधानसभा व विधान परिषदेत प्रश्नोत्तराचा तास राहणार नाही. म्हणून यावेळी विधिमंडळातील प्रश्नोत्तरे सांभाळणारा विभागच (कक्ष) दिसणार नाही. त्यामुळे विभागात कार्यरत कर्मचारी सुद्धा नागपुरात पोहोचलेले नाहीत.
हिवाळी अधिवेशनासाठी केवळ सहा दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. १९ डिसेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल. या बैठकीत कामकाज वाढवायचे की नाही, यावर निर्णय घेतला जाईल. सध्या सरकारशी संबंधित सूत्रांनी मात्र अधिवेशनाचा कालावधी वाढेल, याची शक्यता नाकारली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सरकार स्थापन होण्यास एक महिन्यापेक्षा अधिक वेळ लागला. ३० नोव्हेंबर रोजी आमदारांनी शपथ घेतली. अशा वेळी त्यांना अधिवेशनाच्या तयारीसाठी वेळच मिळाला नाही.
आमदारांकडून आॅनलाईन प्रश्नही पुरेशा प्रमाणावर मिळाले नाहीत. सरकारच्या अजेंड्यात जितके कामकाज आहे, ते सहा दिवसात पूर्ण होईल. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा विधिमंडळाचे कामकाज हे त्यांच्या अध्यक्ष बनण्यापूर्वीच निश्चित झाल्याचे सांगत याचे संकेत दिले होते. सोबतच त्यांनी पुढचे अधिवेशन हे नागपूर कराराप्रमाणे व्हावे, याची काळजी घेण्याचा प्रयत्न करू, असेही सांगितले होते.कामकाज कमी आहे आणि प्रश्नही कमी आले आहेत. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास ठेवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, दोन्ही सभागृहाचे कामकाज हे एका तासाच्या प्रश्नोत्तरानेच सुरु होत असते. आमदारांचे प्रश्न व मंत्र्यांची लिखित उत्तरे याच्या पुस्तिकेचे वितरण केले जाते.सुरक्षारक्षकही पोहोचले
विधिमंडळाचे सुरक्षारक्षकही पोहोचले असून, त्यांनी विधानभवनाची सुरक्षा व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली आहे. सोबत पोलिसांचीही सुरक्षा आहे. विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी तयारी वसुरक्षेचा आढावाही घेतला.