नागपूर : वेगवेगळे सामाजिक प्रश्न साेडविणे व समाज विघटन थांबवून समाज प्रस्थापित करणे आजच्या पिढीसमाेरचे आव्हान आहे. महापुरुषांच्या विचारांचा जागर करूनच समतामूलक समाजाची स्थापना शक्य हाेईल. महात्मा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना चालना दिली तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पुराेगामी हाेईल, असे मत राज्याच्या समाज कल्याण विभागाचे आयुक्त डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने १ एप्रिल ते १ मे २०२३ पर्यंत ‘सामाजिक न्याय पर्व’ साजरे केले जात आहे. याअंतर्गत महात्मा ज्याेतिबा फुले यांचा जयंती कार्यक्रम मंगळवारी दीक्षाभूमीस्थित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयाेजित करण्यात आली. याप्रसंगी नागालँडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप तामगाडगे, महाज्याेतिचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, क्रीष्णा इंगळे, भूषण दवडे, भूपेश थुलकर, मायाताई घोरपडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीप्रथा नष्ट करण्यासाठी लढा दिला, स्त्रि शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. सामाजिक न्याय विभागाद्वारे फुलेवाडा शैक्षणिक योजना तयार करुन सामजिक समता निर्माण करण्याचे हाती घेतले असून ज्योतिबांच्या प्रति हेच खरे अभिवादन ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या विविध याेजनांची माहिती दिली.
याप्रसंगी संदीप तामगाडगे यांनी सामाजिक समतेमुळे पूर्वोत्तर भारतातील नागालँड राज्यात प्रथमच दोन महिला विधानसभा सदस्य निवडून आल्याचे सांगितले. महात्मा फुले यांनी न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या चार तत्वांवर आधारित सत्यशोधक समाजाची स्थापना करुन समाजातील अनेक कुप्रथा बंद केल्या व पर्यायवाचक समाज व्यवस्था निर्माण केली. पुरुष बरोबरच महिलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात त्यांनी आणले. महिलांची गुलामगिरीच्या बेड्यातून सुटका केली. ज्योतिबांच्या प्रागतिक विचारांमुळेच महिलांना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळाल्याचे संदीप तामगाडगे म्हणाले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. सुकेशिनी तेलगोटे यांनी आभार मानले.