अग्निशमन विभागात ६९ टक्के पदे रिक्त : दर महिन्याला होताहेत ३-४ कर्मचारी निवृत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नैसर्गिक आपत्ती असाे वा आगीची घटना, मनपाच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी व अधिकारी बचावासाठी सदैव तत्पर असतात. परंतु सध्या अग्निशमन विभाग मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. विभागात दोन तृतीयांश पदे रिक्त आहेत. त्यात दर महिन्याला तीन ते चार कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत. मनुष्यबळाचा अभाव असल्याने कार्यरत असलेल्यांवर कामाचा भार वाढत आहे. एखादी मोठी घटना घडल्यास कर्मचारी व अधिकाऱ्यांची सुटी रद्द करावी लागते. मनुष्यबळाची समस्या वेळीच न सुटल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.
गेल्या वर्षी कोविड काळात विभागातील ४५ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आलेत. त्यानंतरही विभागाचे निर्जंतुकीकरण करून विभाग सुरू ठेवण्यात आला. अत्यावश्यक सेवा असल्याने काम सुरू ठेवले. असे असतानाही विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता जुलै २०१९ मध्ये ५६ ड्रायव्हर, ५ फिटर व १ इलेक्ट्रिशियनची भरती करण्यात आली. ही भरती केली नसती तर परिस्थिती अधिकच बिकट झाली असती.
.....
मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा
फायरमन सेवा प्रवेश नियमात बदल करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला असून पाठपुरावा सुरू आहे. लवकरच शासनाकडून भरतीला मंजुरी मिळेल, अशी आशा आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मनपा चालवीत असल्याने विभागाचे कर्मचारी प्रशिक्षित आहेत.
- राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा
......
कंत्राटी कर्मचारी ठेवण्याचा पर्याय
कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे अग्निशमन विभागाला समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी कंत्राट पद्धतीवर १०० कर्मचारी नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास मोठे संकट उभे ठाकण्याची शक्यता असल्याचे अग्निशमन सेवा समिती सभापती संजय बालपांडे यांनी सांगितले.
.......
८७२ पदे रिक्त
९ अग्निशमन केंद्रे (फायर स्टेशन), आपत्ती निवारण कक्ष, अग्निशमन प्रशिक्षण केंद्रांसाठी ६११ कर्मचारी व अधिकाऱ्यांची गरज आहे. परंतु विभागात १९० कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजेच ६९ टक्के पदे रिक्त आहेत. वास्तविक आकृतिबंधानुसार १३ फायर स्टेशनसाठी ८७२ पदे मंजूर आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी यांची पदे रिक्त आहेत.
.....
पद मंजूर पद रिक्त
अग्निशमन केंद्र अधिकारी ११ १०
सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी ३० २६
उपअग्निशमन अधिकारी ३० २०
प्रमुख अग्निशमन विमोचकांच्या ५६ २०
ड्रायव्हर-ऑपरेटरच्या ११२ ४३,
वाहनचालक ७ ७
अग्निशमन विमोचक ४६ २८५
मुख्य मॅकेनिक १ १
फिटक कम ड्रायव्हर १० ४
.........