नागपूर : उपराजधानी नागपुरातील मोकाट जनावरांचे चित्र नागरिकांना तापदायक आहे. केवळ धारा काढण्यापुरता या दुधाळ जनावरांचा संबंध मालकांसोबत येतो. नंतर दिवसभर ही जनावरे बाजारपेठेत मोकाट फिरत असतात. परिणामत: वाहतुकीला अडथळा होतोच पण अपघाताचीही शक्यता बळावते. आश्चर्य हे की २० हजारांवर जनावरांसाठी केवळ तीन कोंडवाडे आहेत.
नागपूर शहरामध्ये २०१२ च्या पशुगणनेनुसार २० ते २२ हजार जनावरे आहेत. त्यापैकी दुधाळ जनावरे १० हजार आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये असलेल्या बाजारपेठांमध्ये मोकाट जनावरांचा त्रास जाणवतो. धरमपेठ, बुधवारपेठ, गोकुळपेठ, बर्डी, कळमना मार्केट, कॉटन मार्केट आदी भागांमध्ये हा उपद्रव अधिक जाणवतो. बाजारपेठेत खरेदीसाठी जाणाऱ्यांसोबतच विक्रेत्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. महानगर पालिकेकडे पथक आहे. मात्र कारवाया म्हणाव्या तशा होत नसल्याचे नागरिकांचे मत आहे. कोंडवाड्यात जनावरे टाकल्यावर दंड भरून ती पुन्हा मोकळी सुटतात. त्यामुळे समस्येवर कायमस्वरूपी उपाय सापडत नाही. चरण्यासाठी मोकाट सोडलेली जनावरे ही अधिकच मोठी समस्या आहे.
वाहतुकीला अडथळा
मोकाट जनावरे पावसाळ्यात ऐन रस्त्यावर बसलेली असतात. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. बाजारपेठेतही जनावरांचा उच्छाद असतो. भाजीविक्रेत्यांना जनावरे आणि बकऱ्या हाकलण्यासाठी हातात काठी घेऊन बसण्याशिवाय गत्यंतर नसते. शहराच्या काही भागात हा त्रास नसला तरी अन्य ठिकाणी मात्र नागरिकांना हा त्रास नित्याचाच झाला आहे.
...
मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेचे पाच कोंडवाडे आहेत. त्यातील तीन कार्यरत आहेत. मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांवर एफआयआर दाखल करण्याची कारवाईदेखिल होत असते. पथकाकडूनही जनावरे कोंडवाड्यात टाकण्याची कारवाई नियमित केली जाते. दररोज १० ते १२ जनावरे पथकाकडून कोंडवाड्यात टाकली जातात.
- रोहिदास राठोड, प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा
...
शहरातील दुधाळ जनावरांचे परवानाधारक - ४५७
परवानाधारकांकडे असणारी जनावरे - १० हजार
शहरातील जनावरांचे गोठे - १०४६
पशुगणनेतील गायी - ४६२१
पशुगणनेतील म्हशी - ५३७९