नागपूर : हल्ली कार्पोरेट कंपन्यांची शक्ती वाढली आहे. सर्वच क्षेत्रात या कंपन्यांचे प्रस्थ वाढताना दिसत आहे. असे असले तरी ‘बिना सहकार, नही उद्धार’ हे सर्वांनी लक्षात ठेवावे. पारदर्शी सहकार क्षेत्रच या कंपन्यांना टक्कर देऊ शकते, असा संदेश सहकार वाचवा परिषदेने नागपुरात दिला. या सोबतच, सहकार क्षेत्राने काही बंधने स्वीकारायला हवीत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
महाराष्ट्र किसान सभा नागपूर विभागाच्यावतीने गणेशपेठ येथील सामाजिक भवनात मंगळवारी एक दिवसीय सहकार वाचवा परिषद झाली. अध्यक्षस्थानी आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे होते. किसान सभेचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे, राज्य सहसचिव अशोक सोनारकर(अमरावती), राष्ट्रीय कौन्सिल सदस्य डाॅ. महेश कोपुलवार, भाकपचे राज्य सचिव शिवकुमार गणवीर पाहुणे होते.
नामदेव गावडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करून बाजारात विक्री केल्यास मोठा नफा मिळू शकतो. हे सहकारातूनच शक्य आहे. डाॅ. श्रीनिवास खांदेवाले प्रकृती अस्वाथ्यामुळे उपस्थित नव्हते. त्यांनी आपल्या ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन सहकाराचे महत्त्व विषद केले. केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकरीच नाही तर उपभोक्त्यांची प्रचंड लूट होणार असल्याचा इशारा दिला. शाम काळे म्हणाले, मोदी सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे. जाचक कायदे निर्माण करून कामगारांना देशोधडीला लावले जाणार असल्याने एकजूट करून सहकाराच्या माध्यमाने पुढे जावे लागेल, असा सल्ला दिला. परिषदेचे आयोजक अरुण वनकर यांनी लेखी प्रस्ताव सादर करून त्यावर विवेचन केले. संचालन जयश्री चहांदे तर आभार गंगाराम खेडेकर यांनी मानले. परिषदेला विदर्भातून प्रतिनिधी सहभागी झाले होते.