नागपूर: नागपूरचे दाहक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. असे असताना उष्माघाताचा रुग्णांची नोंद घ्यायला कोणी तयार नसल्याचे चित्र आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) केवळ दोन रुग्णांची नोंद झाली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मंगळवारी नागूपरचे तापमान वाढून ४४.८ अंश सेल्सिअसवर पोहचले. तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यास शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. चक्कर, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास जीवाला धोका होतो. मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ झाल्याने उष्माघाताची शक्यता वाढली आहे. मात्र मेयो सोडल्यास मेडिकल व महानगरपालिकेच्या शितकक्षात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. मेयोमध्ये भरती असलेल्या दोन रुग्णामध्ये एक १७ वर्षीय तर दुसरे ५० वर्षीय पुरुष आहे. मागील २४ तासांत हे रुग्ण भरती झाल्याचे सांगण्यात येते. सध्या मेयोमध्ये १५ बेडचे शीतकक्ष स्थापन केले आहे.
- कामाशिवाय उन्हात निघणे टाळा डॉक्टरांनुसार, कामाशिवाय उन्हात निघणे टाळायला हवे. भरपूर पाणी प्यायला हवे. सैल कपडे वापरावीत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा टोपीचा वापर करावा. प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी. दुपारी उन्हात शारिरीक श्रमाची कामे करू नये. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबूपाणी, ताक आदी पेय प्यायला हवे. घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करण्याचे आवाहनही मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.
-संशयित मृत्यूचे कधी होणार ‘आॅडिट’मे महिना संपायला आला तरी संशयित मृत्यूचे ‘आॅडिट’ झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागूपर शहरात मागील २२ दिवसांत सहा अनोळखी व्यक्ती बेशुद्धा अवस्थेत सापडले. त्यांना, मेयो व मेडिकलमध्ये दाखल केले असताना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. हा उष्माघाताचा मृत्यू आहे का, हे तपासण्यासाठी ‘डेथ आॅडिट’ समिती आहे. परंतु अद्यापही या समितीची बैठक झालेली नाही.