पोलीसांची विशेष मोहीम
भिवापूर : पंधरा दिवसांपूर्वी शहरातील एका दुचाकी अपघातात आईवडिलांना एकुलता एक असलेल्या २० वर्षाच्या मुलाचा हकनाक मृत्यू झाला. वाहन नवीन असतानासुध्दा मृत मुलाकडे चालक परवाना नसल्यामुळे त्याच्या कुटूंबाला विम्याचा लाभ मिळू शकला नाही. अपघाताचे प्रमाण दिवसागणिक वाढत असताना यातील अनेकांकडे चालक परवानाच नसतो. याची दखल घेत भिवापूर पोलीसांनी विना परवाना वाहन चालविणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. दरम्यान, शुक्रवारी या मोहिमेअंतर्गत शंभरावर तरुणांची तपासणी करीत शेवटचा अल्टिमेटम दिला. उद्या विना परवाना आढळलात तर सोडणार नाही. निश्चित कारवाई करणार, असा दमही पोलिसांनी त्यांना दिला. देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. मात्र अपघातांची मालिका थांबलेली नाही. अपघातग्रस्त अनेक वाहन चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना, इन्शुरन्स नसल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे. त्यामुळे अपघातात हकनाक बळी गेलेल्या पीडित कुटुंबीयाला विम्याचा लाभ मिळत नाही. गत महिनाभराच्या कालखंडात शहरात झालेल्या दोन - चारही अपघातात चालकाकडे वाहन परवाना नसल्याचे समोर आले आहे. दोन-चार लाख रुपये किंवा त्यापेक्षाही अधिक महागडे वाहन खरेदी करणारा व्यक्ती हजार पाचशे रुपये खर्च करून वाहन परवाना का काढत नाही हा प्रश्नच आहे.
यासाठी भिवापूर पोलीसांनी आता त्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांच्या नेतृत्वात पोलीसांनी शुक्रवारी सकाळपासूनच राष्ट्रीय मार्गावरील पोलीस स्टेशन समोर दुचाकी चालकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली. दरम्यान दिवसभरात शंभराहून अधिक दुचाकी चालकांकडे वाहन चालविण्याचा परवानाच नसल्याचे आढळले. यात सत्तर टक्के महाविद्यालयीन तरुणांचा समावेश होता. दरम्यान पहिल्याच दिवशी कठोर कारवाई न करता, त्यांना पोलीस स्टाईल मध्ये सज्जड दम देण्यात आला. यावेळी सहायक निरीक्षक शरद भस्मे यांच्यासह पोलीस कर्मचारी दिपक जाधव, राजन भोयर, रविंद्र लेंडे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
शिबीराचे आयोजन व्हावे
शहरातील अनेकांकडे दुचाकी, चारचाकी वाहन आहे. त्यातील अनेकांकडे वाहन परवाना नाही. त्यामुळे आरटीओ विभागाकडून तालुकास्थळावर वाहन परवाना विषयक शिबिराचे आयोजन होणे आवश्यक आहे. यासंदर्भात सहायक निरीक्षक शरद भस्मे यांनी सांगितले की, शिबिर आयोजनाबाबत पोलीस विभागाने संबंधीत विभागाशी पत्र व्यवहार केला आहे. मात्र कोरोना संसर्गजन्य परिस्थीतीमुळे शिबिर आयोजनात अडचण येत असल्याचे सांगितले.
--
विनापरवाना वाहन चालविणाऱ्याविरुद्ध कारवाईची ही मोहीम यापुढे सुरूच राहणार आहे. शहरात होणारऱ्या अपघातात तरुणवर्गाची संख्या अधिक आहे. त्यात विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाहन परवाना काढावा. याकडे पालकांनी सुध्दा विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये.
- महेश भोरटेकर पोलीस निरीक्षक, भिवापूर