सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसून येऊ लागली असली तरी शासकीय रुग्णालयातील आयसीयू व व्हेंटिलेटरचे बेड फुल आहेत. व्हेंटिलेटरअभावी रुग्णांना मृत्यूला सामोर जावे लागत असताना मेडिकलला पीएम केअर फंडातून मिळालेल्या ५० व्हेंटिलेटरलाच ‘व्हेंटिलेटर’ची गरज असल्याचे दिसून येत आहे. हे व्हेंटिलेटर अचानक बंद पडत असल्याचे, ऑक्सिजनचा अचानक पुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी आहेत. याच फंडातून मेयोला मिळालेल्या १३० व्हेंटिलेटरमधून १३ बंद अवस्थेत मिळाले. सध्याच्या स्थितीत यातील एकूण २८ व्हेंटिलेटर नादुरुस्त अवस्थेत आहेत, अशी माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला; परंतु गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली, तरी तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याने वैद्यकीय सोयींना घेऊन तयारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शहरात शासकीय व खासगी मिळून आयसीयूचे २,२६७ तर व्हेंटिलेटरचे ५८० बेड आहेत. सोमवारी ऑक्सिजनचे १५३८ तर व्हेंटिलेटरचे केवळ ४ बेड रिकामे होते. यातही मंगळवारी शासकीय रुग्णालयात आयसीयूचे ४ तर व्हेंटिलेटरचा एकही बेड रिकामा नव्हता. यावरून व्हेंटिलेटरअभावी कोरोनाच्या गंभीर रुग्णांची किती हेळसांड होत असावी हे दिसून येते. मेडिकलमध्ये गंभीर कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन या वर्षी पीएम केअर फंडातून ५० व्हेंटिलेटर मिळाले. यामुळे मेडिकलाल मोठा दिलासा मिळाला; परंतु या व्हेंटिलेटरची ट्रायल घेतल्यावर ते अचानक बंद पडत असल्याचे किंवा रुग्णाच्या गरजेनुसार ‘सेट’ केलेला ऑक्सिजनचा पुरवठा अचानक कमी होत असल्याचे आढळून आले. यामुळे वरिष्ठ डॉक्टरांनी या व्हेंटिलेटरचा वापर आयसीयूमध्ये करू नका, असा सल्ला दिल्याची माहिती आहे.
-मेडिकलचा १५० व्हेंटिलेटरचा प्रस्ताव पडला मागे
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मेडिकल प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे १५० व्हेंटिलेटरचा प्रस्ताव पाठविला होता; परंतु यादरम्यान मागील वर्षी पीएम केअर फंडातून २० व आता ५० व्हेंटिलेटर आल्याने १५० व्हेंटिलेटरचा प्रस्ताव मागे पडला आहे. हे व्हेंटिलेटर कमी किमतीचे आहेत. यामुळे त्यात उणिवा राहतीलच, असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-मेयोला १३ व्हेंटिलेटर बंद अवस्थेत मिळाले
मेयोला पीएम केअर फंडातून मागील वर्षी ९० व्हेंटिलेटर मिळाले. वरिष्ठांच्या सूचनानुसार यातील सात शालिनीताई मेघे, ऑरेंज सिटी हॉस्पिटल व लता मंगेशकर हॉस्पिटलला वाटून देण्यात आले. उर्वरित ८३ मधून ४ व्हेंटिलेटर खराब होते. सध्या यातील ७१ रुग्णसेवेत असून उर्वरित नादुरुस्त अवस्थेत आहेत. या वर्षी मिळालेल्या ४० व्हेंटिलेटरमधून ९ खराब होते. उर्वरित ३१ व्हेंटिलेटरमधील २८ रुग्णसेवेत असून ३ नादुरुस्त अवस्थेत आहे. खराब मिळालेल्या ९ व्हेंटिलेटरपैकी संबंधित कंपनीने ५ व्हेंटिलेटर बदलून दिल्याची माहिती आहे.
-कोठे किती सुरू, किती बंद
मेडिकल : ५० मिळाले : ट्रायल घेणे सुरू
मेयो : १३० मिळाले : २८ नादुरुस्त